मंगळवार पेठेत श्री भैरवनाथ पालखी प्रदक्षिणा सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:57 AM2020-02-10T10:57:58+5:302020-02-10T10:59:30+5:30

कोल्हापूर : मंगळवार पेठ, साठमारी परिसरातील आराध्य दैवत श्री भैरवनाथ व श्री काळभैरव देवाची पालखी प्रदक्षिणा सोहळा माघ पौर्णिमेनिमित्त ...

Shri Bhairavnath Palkhi Prakashina Ceremony in Mangalwar Peth | मंगळवार पेठेत श्री भैरवनाथ पालखी प्रदक्षिणा सोहळा उत्साहात

मंगळवार पेठेतील श्री भैरवनाथ व श्री काळभैरवनाथ पालखी प्रदक्षिणा सोहळा उत्साहात पार पडला.

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवार पेठेत श्री भैरवनाथ पालखी प्रदक्षिणा सोहळा उत्साहातगुलाल-खोबऱ्याची उधळण : ‘चांगभलं’च्या गजरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी

कोल्हापूर : मंगळवार पेठ, साठमारी परिसरातील आराध्य दैवत श्री भैरवनाथ व श्री काळभैरव देवाची पालखी प्रदक्षिणा सोहळा माघ पौर्णिमेनिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुलाल-खोबऱ्यांची उधळण, चांगभलंऽऽ..चा गजर, फटाक्यांच्या आतषबाजीने सवाद्य पालखी सोहळा झाला. भैरवनाथ भक्त परिवाराच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माघ पौणिमेनिमित्त साठमारी परिसरात श्री भैरवनाथ व श्री काळभैरव उत्सव दिवसभर भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सकाळी महाभिषेक, आरतीसह धार्मिक कार्यक्रम पुजारी वैभव विश्वास माने यांनी पार पाडले. मंदिरात दिवसभर नैवेद्य दाखविण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

सायंकाळी आमदार चंद्रकांत जाधव आणि नगरसेवक विजयराव सूर्यवंशी यांच्या हस्ते पालखी पूजन करून प्रदक्षिणा सोहळ्याचा प्रारंभ झाला. फुलांनी सजविलेली पालखी गोखले महाविद्यालय चौकातील नागदेवता, पादुका येथे भेटीनंतर पालखी पुन्हा पाटाकडील तालीम, मंडलिक गल्ली, मिरजकर तिकटी मार्गे बिनखांबी गणेश मंदिरनजीक रंकभैरवनाथ मंदिर येथे पोहोचली. तेथे देवभेट व आरती सोहळ्यानंतर पुन्हा तस्ते गल्ली मार्गे पालखी साठमारी चौकातील मंदिरात आली.

प्रदक्षिणा मार्गावर फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या सजल्या होत्या, चांगभलंऽऽच्या गजरात पालखीवर फुलांची तसेच गुलाल-खोबऱ्याची उधळण केली जात होती. धनगरी ढोल, ढोलीबाजा सवाद्यासह फटाक्यांची आतषबाजी केली जात होती.

मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी, प्रसादाचे आयोजन केले होते. पालखी प्रदक्षिणेत नगरसेवक संभाजी जाधव, श्री स्वामी विवेकानंद आश्रमचे अध्यक्ष व माजी नगरसेवक आनंदराव पायमल, बाळासाहेब चौगुले, भीमराव पोवार, हरिभाऊ पायमल, नरेंद्र पायमल, संजय बोंद्रे, एकनाथ टिपुगडे, अनिल जाधव, सदाशिव ढेरे, आदी मान्यवरांसह परिसरातील तालीम संस्था, तरुण मंडळांचे कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
 

 

Web Title: Shri Bhairavnath Palkhi Prakashina Ceremony in Mangalwar Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.