श्री क्षेत्र आडी येथे श्रीदत्तजन्मसोहळा साधेपणाने सम्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:15 PM2020-12-30T16:15:18+5:302020-12-30T16:16:23+5:30
Datta Jayanti Aadi Kolhapur- श्री क्षेत्र आडी येथील श्रीदत्त देवस्थान मठात सायं. ५ वाजून ५ मिनिटांनी श्रीदत्तजन्मसोहळा अत्यंत साधेपणाने सम्पन्न झाला.
बाबासो हळिज्वाळे
कोगनोळी : कोरोना महामारीमुळे अनेकांच्या जीवनात आर्थिक संकट उद्भवले आहे. त्या अनुषंगाने इतरही काही संकटे उद्भवली आहेत. त्या सर्व संकटांवर जय मिळविण्याचा दृढ संकल्प श्रीदत्त जयंतीच्या निमित्ताने करावा. जयन्ती म्हणजे जय मिळविणारी. जयन्ती म्हणजे जय प्रदान करणारी. श्रीदत्तजयंती ही सर्वांच्या जीवनात जय मिळवून देणारी ठरावी, असे विचार परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने व्यक्त केले.
श्री क्षेत्र आडी येथील श्रीदत्त देवस्थान मठात सायं. ५ वाजून ५ मिनिटांनी श्रीदत्तजन्मसोहळा अत्यंत साधेपणाने सम्पन्न झाला. यावेळी प. पू. परमात्मराज महाराज यांनी सांगितले की, "दृढसंकल्पाने असाध्य गोष्टी सुद्धा साध्य होऊन जातात. त्यामुळे आर्थिक संकटाने किंवा दुसर्या कोणत्याही संकटांनी खचून न जाता त्या संकटांवर जय मिळवणारच, असा प्रबळ आशावाद व प्रबळ प्रयत्नवाद उराशी बाळगणे गरजेचे आहे. २०२० साली तीव्र वेगाने आलेल्या संकटांना नामशेष करण्यासाठी आता २०२१ साली जास्त तीव्र वेगाने झटले पाहिजे. संकटांवर जय मिळवलाच पाहिजे.
जयन्ती शब्दाचा रूढार्थ व ध्वनितार्थ वर्तेट ग्रंथात सांगितला आहेच. परमाब्धि ग्रंथ व्यवस्थित समजून घेण्यासाठी वर्तेट, सत्पोष, महोन्नय इत्यादी ग्रंथांचे वाचनही भाविकांनी करावे. नवीन वर्षाच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा."
दरवर्षी श्रीदत्तजयंतीच्या निमित्ताने परमाब्धिप्रसार महोत्सव फार मोठ्या प्रमाणात संपन्न होत असतो. परंतु यावर्षी कोरोना संकटाची पार्श्वभूमी असताना शासकीय नियमांचे पालन करून अत्यंत मर्यादित स्वरूपात श्रीदत्त जयंती सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री देवीदास महाराज, श्रीराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री चिदानंद महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री अमोल महाराज, श्री मारुती महाराज, श्री समाधान महाराज, श्री श्रीधर महाराज इ. उपस्थित होते.