‘बिद्री’साठीे अर्ज भरायला झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:41 AM2017-09-12T00:41:53+5:302017-09-12T00:41:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी, दुसºया दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली होती. दुसºया दिवशी विविध गटांतून तब्बल ४६९ अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत ५२४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत ११९३ अर्जांची विक्री झाली आहे.
आज, मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
‘बिद्री’ कारखान्यासाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अचानक कार्यक्रम जाहीर झाल्याने शुक्रवारी केवळ ५५ जणांनीच अर्ज दाखल केले. शनिवार व रविवार दोन दिवस शासकीय सुटी असल्याने सोमवारी दुसºया दिवशी इच्छुकांसह समर्थकांची तोबा गर्दी झाली होती. सकाळी अकरा वाजल्यापासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसर फुलून गेला होता. अर्ज विक्रीची व्यवस्था प्रांत कार्यालयाच्या तळमजल्यात करण्यात आली असून परिपूर्ण अर्ज पहिल्या मजल्यावर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी स्वीकारले. सकाळपासूनच इच्छुकांची कागदपत्रे गोळा करून अर्ज दाखल करण्यासाठी पळापळ सुरू होती तर माजी आमदार दिनकरराव जाधव, राहुल देसाई, भूषण पाटील यांच्यासह दोन्ही गटांचे नेते तळ ठोकून होते.
सोमवारी अर्ज दाखल करणाºयांमध्ये दिनकरराव जाधव, ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, माजी संचालक पंडितराव केणे, माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बी. एस. देसाई, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील, बाजार समितीचे संचालक नाथाजी पाटील, बालाजी फराकटे, नंदकिशोर सूर्यवंशी, के.जी. नांदेकर, उमेश भोईटे, रमेश वारके, भरत पाटील आदींचा समावेश आहे.