ऐन दिवाळीदिवशी रस्त्यावरील खड्ड्यांत अभ्यंगस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 06:35 PM2020-11-14T18:35:37+5:302020-11-14T18:37:03+5:30
roadsefty, kolhapurnews, morcha कोल्हापूर शहरभर आनंदाचा, मांगल्याचा सण म्हणून दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत असताना शनिवारी पहाटे फुलेवाडी रिंग रोडवर क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात खड्ड्यांचा निषेध नोंदवत नागरिकांनी खड्ड्यातच अभ्यंगस्नान केले. क्रांतिसिंह नाना पाटील नगर कृती समितीच्या वतीने माजी नगरसेवक अमोल माने, सुहास आजगेकर, समीर वर्णे यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
कोल्हापूर : शहरभर आनंदाचा, मांगल्याचा सण म्हणून दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत असताना शनिवारी पहाटे फुलेवाडी रिंग रोडवर क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात खड्ड्यांचा निषेध नोंदवत नागरिकांनी खड्ड्यातच अभ्यंगस्नान केले. क्रांतिसिंह नाना पाटील नगर कृती समितीच्या वतीने माजी नगरसेवक अमोल माने, सुहास आजगेकर, समीर वर्णे यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
फुलेवाडीपासून नवीन वाशीनाकापर्यंत पावसाळ्यानंतर रिंग रोडचे डांबरीकरण करण्यात आले; पण क्रांतिसिंह नाना पाटील नगरपासून जुना रिंग रोड खड्डेमय ठेवून नवीन रोडचे डांबरीकरण करण्यात आले; त्यामुळे या जुन्या मार्गावरील कणेरकरनगर, लक्ष्मीबाई साळोखे कॉलनी, अरुण सरनाईकनगर, निचितेनगर या कॉलन्यांतील नागरिकांना ये-जा करण्यात तसेच खड्ड्यांमुळे धुळीचा मोठा त्रास होत आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणामध्ये महापालिका प्रशासनाने सोईस्कर दुर्लक्ष केले आहे.
त्या निषेधार्थ क्रांतिसिंह नाना पाटील नगर नागरी कृती समितीच्या वतीने ऐन दिवाळीच्या पहाटे शनिवारी या रस्त्यावरील खड्ड्यातच अभ्यंगस्नान करून प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला. खड्ड्यांना रांगोळीने सजावट करून त्यामध्ये हे अभ्यंगस्नान झाले. यंदाची दिवाळी खड्ड्यात , महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला; पण जमावबंदीचे निर्देश पाळत कृती समितीने हे आंदोलन केल्याने पोलिसांनाही काहीही करता आले नाही.
कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडवरील क्रांतिसिंह नाना पाटीलनगर ते नवीन वाशी नाका या जुन्या रिंग रोडचे डांबरीकरण न केल्याच्या निषेधार्थ नागरी कृती समितीच्या वतीने ऐन दिवाळीदिवशी शनिवारी या रस्त्यावरील खड्ड्यातच अभ्यंगस्नान करण्याचे अनोखे आंदोलन करीत महापालिकेचा धिक्कार नोंदविला.