शिरोळमधून मुंबईला एसटी धावणार कधी?

By admin | Published: January 8, 2016 12:11 AM2016-01-08T00:11:52+5:302016-01-08T01:02:54+5:30

खासगी वाहनांना प्राधान्य : कुरुंदवाड आगारातून मुंबईला एकही बस नाही

Shripad to run Mumbai from Shirol? | शिरोळमधून मुंबईला एसटी धावणार कधी?

शिरोळमधून मुंबईला एसटी धावणार कधी?

Next

संतोष बामणे -- जयसिंगपूर--शिरोळ तालुक्यातून एकही एसटी बस मुंबईकडे जाणारी नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे तालुक्याकडे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. राजधानीच्या ठिकाणी जाण्यासाठी एकही एसटी नसल्यामुळे खासगी वाहनांना प्राधान्य देऊन येथील प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे राजधानीला जाण्यासाठी कायमस्वरूपी तालुक्यातून एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवासीवर्गांतून होत आहे.शिरोळ तालुक्यात प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कुरुंदवाड येथे एस. टी. आगार आहे. तालुक्यातील ५३ गावे व दोन शहरे या आगारावर अवलंबून आहेत. जयसिंगपुरातून रेल्वे सेवा असली, तरी एसटीलाही तितकेच महत्त्व आहे. तालुक्यात जयसिंगपूर हे सांगली-कोल्हापूर महामार्गावरील मोठे शहर असून, जयसिंगपुरातून दररोज १६०० हून अधिक बसेस ये-जा करतात. सध्या शिरोळ तालुक्यातून कुरुंदवाड-पुणे एसटी बसेसच्या दररोज सात फेऱ्या होतात. यापासून कुरुंदवाड आगाराला चांगले उत्पन्न मिळते.
कुरुंदवाड आगाराकडून मुंबई येथे जाण्यासाठी तालुक्यातून एकही एसटी बस नाही, ही शोकांतिका आहे. जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, आजरा या तालुक्यांतून अगदी खेडेगावातूनही मुंबई, कल्याण, बोरिवली, ठाणे, भार्इंदर, दादर, आदी ठिकाणांवर गाड्या दररोज सोडण्यात येतात. मात्र, तालुक्यात प्रवासी असतानादेखील रेल्वेच्या भरवशावर राहून मुंबईकडे जाणारी एकही एसटी कुरुंदवाड आगाराकडून सोडली जात नाही.
जयसिंगपूर येथे रेल्वे स्टेशन असून प्रवासी रेल्वेनेही प्रवास करतात. मात्र, कोल्हापूरहून रेल्वे फुल्ल आरक्षित होऊन येत असल्याने जयसिंगपूरमध्ये आरक्षित तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना ‘वेटिंग’वर अवलंबून राहून किंवा जनरल गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्याचबरोबर खासगी बसमधून प्रवास करण्यासाठी एसटीच्या तुलनेत दुप्पट दर द्यावा लागत आहे.
जयसिंगपुरातून दररोज ३० हून अधिक खासगी बसेस मुंबईकडे धावतात. मात्र, सामान्य नागरिकांना त्यांचा दर परवडणारा नसतो. जादा दर देऊन खासगी बसने प्रवास करावा, नाही तर रेल्वेतून धक्केखात प्रवास करावा लागत आहे किंवा सांगली, मिरज येथील एसटी बसस्थानकातून मुंबईला बस पकडावी लागते. कुरुंदवाड आगाराकडून सकाळच्या सुमारास दोन, सायंकाळी दोन, रात्री दोन अशा बसेस ग्रामीण भागातून, दत्तवाड, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, शिरोळ, जयसिंगपूर, मुंबई अशाप्रकारे बसेचची मागणी प्रवासीवर्गांतून होत आहे. ही बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ तसेच पैशांची बचत होऊन कुरुंदवाड आगाराच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. (क्रमश:)


शिरोळ तालुक्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून, तालुक्यातील प्रवाशांना सांगली, मिरज, इचलकरंजी येथे जाऊन मुंबईसाठी बस पकडावी
लागते, अन्यथा रेल्वेचे
वेटिंग आणि खासगी
बसच्या जास्त दराचा सामना करावा लागतो. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातून थेट मुंबईला गाडी सोडल्यास प्रवाशांची सोय होणार आहे.
- नितीन बागे,
सामाजिक कार्यकर्ते, जयसिंगपूर.

तालुक्यातून सध्या कुरुंदवाड-पुणे या गाडीच्या सात फेऱ्या असून, मुंबईला फक्तसुटीच्या हंगामात कुरुंदवाड-बोरिवली एक गाडी सोडली जाते. प्रवाशांची मागणी असल्यास आगाराकडून दररोज गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येईल. मध्यंतरी सांगली आगाराकडून कुरुंदवाड आगाराच्या लांब पल्ल्याच्या गाड्या कमी केल्या. त्यामुळे आगाराला अडचणी निर्माण होत आहेत. - एम. बी. भंडारे,
कुरुंदवाड आगारप्रमुख.

Web Title: Shripad to run Mumbai from Shirol?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.