पणनमंत्र्यांकडून शिरापूरकर धारेवर
By admin | Published: January 5, 2015 12:25 AM2015-01-05T00:25:27+5:302015-01-05T00:43:04+5:30
लवाद नेमणूक प्रकरण : दबावाने तारीख पे तारीख
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील झालेल्या गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी लवाद नेमणुकीस टाळाटाळ करणारे जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांना पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी धारेवर धरले. राजकीय दबावापोटी गेले वर्षभर त्यांनी केवळ तारखा देण्यापलीकडे काहीच केले नसल्याने बाजार समिती वर्तुळातून टीकेची झोड उठवली जात आहे.
बाजार समितीच्या संचालकांच्या चुकीच्या कारभारामुळे समितीवर प्रशासक आले. समितीच्या १९८७ पासूनच्या संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी शहर उपनिबंधक रंजन लाखे यांनी केली. यामध्ये अनेक गंभीर ठपके ठेवले आहेत. चौकशीचा अहवाल देऊन दीड वर्षे झाले. त्यानंतर १९८७ पासूनच्या सर्व संचालकांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून म्हणणे घेऊन वर्ष उलटले आहे. तरीही गेले वर्षभर लवाद नेमणुकीची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक करत आहेत. तोपर्यंत मध्यंतरी पणन संचालकांनी फेरचौकशीचे आदेश दिले. त्यानुसार फेरचौकशी होऊन तो अहवालही जिल्हा उपनिबंधकांकडे सादर झाला आहे. तरीही लवाद नेमणुकीस जाणीवपूर्वक विलंब होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याबाबत बाजार समितीमधील काही घटकांनी थेट पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्या कारभाराबाबत तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मंत्री पाटील यांनी लवाद नेमणुकीस विलंब केल्याबद्दल शिरापूरकर यांना शनिवारी चांगलेच धारेवर धरले. तातडीने लवादाची नेमणूक करून दोषी संचालकांकडून बाजार समितीचे झालेले नुकसान वसूल करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. पणनमंत्र्यांनी सांगितल्यानंतर तरी जिल्हा उपनिबंधक लवादाची नेमणूक करणार का? की पुन्हा तारीख पे तारीखच देणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
अनुकंपावरील मुले
सहा महिने लोंबकळत!
बाजार समितीमध्ये अनुकंपावर घेतलेल्या सात मुलांना नियमित केल्याचा प्रस्ताव समितीचे तत्कालीन प्रशासक डॉ. महेश कदम यांनी सहा महिन्यांपूर्वी मंजुरीसाठी जिल्हा उपनिबंधकांकडे दिला आहे. हा प्रस्ताव कायदेशीर व नियमित आहे. तरीही या मुलांना सहा महिने जाणीवपूर्वक लोंबकळत ठेवल्याच्या तक्रारी समिती वर्तुळात येत आहेत.