श्रीपतराव बोंद्रे यांनी संस्था, कार्यकर्ते घडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:24 AM2020-12-29T04:24:53+5:302020-12-29T04:24:53+5:30
श्रीपतराव बोंद्रे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभात ते बोलत होते. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमासाठी आमदार पी. एन. पाटील ...
श्रीपतराव बोंद्रे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभात ते बोलत होते. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमासाठी आमदार पी. एन. पाटील आणि खासदार संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी स्वागत केले.
शाहू छत्रपती म्हणाले, सर्वसामान्यांची कामे करण्याची तळमळ बोंद्रे यांच्याकडे होती. शहाजी छत्रपती आणि त्यांचा विशेष स्नेह होता. त्यामुळेच वैद्यकीय महाविद्यालय काढण्यासाठी त्यांच्या संस्थेला शालिनी पॅलेसची इमारत आणि समोरील मोकळी जागा बक्षीस म्हणून देण्यात आली; परंतु काही ना काही कारणाने हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले नाही. अन्यथा ते पहिले वैद्यकीय महाविद्यालय ठरले असते. गावोगावचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या बोंद्रे यांचा लोकसंपर्क विलक्षण हाेता.
आमदार पी. एन. पाटील यांनी यावेळी बोंद्रे यांच्या अनेक आठवणी जागवल्या. ते म्हणाले, ‘गोकुळ’वर प्रशासक नेमण्याची तयारी सुरू होती. त्यावेळी शरद पवारांशी चर्चा करताना प्रशासक नेमणार असाल तर माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी रोखठोक भूमिका बोंद्रे दादांनी घेतली होती. उपसा योजनांची भरमसाठ बिले केवळ दादांनी रेटा लावल्यामुळे कमी झाली होती. कोल्हापुरात केएमटी सुरू करून पहिली डबलडेकर आणण्याचे श्रेय बोंद्रे यांनाच जाते. मंत्रिपदावरचा हा माणूस बाजार समितीमध्ये गुळाच्या रव्यावर चढून सौदे बोलत असे. त्यामुळे शेतकऱ्यांना १०० रुपये जादा भाव मिळायचा. ज्या शिवाजी पेठेमध्ये काँग्रेसची टोपी घालायची बंदी होती. त्याच पेठेतून टोपी घालून बोंद्रे यांनी काँग्रेस पक्षाचे पहिले नगराध्यक्ष बनण्याची कामगिरी केली होती.
खासदार मंडलिक म्हणाले, बोंद्रे यांनी शेतीचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. विविध क्षेत्रांतील सहकारी संस्था सुरू केल्या. शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. पुढच्या पिढीपर्यंत हे विचार पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी बोंद्रे यांचा जीवनपरिचय करून दिला. कोगील येथील भूपाल पाटील, ‘गोकुळ’चे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी आठवणीतील ‘दादा’ या गौरवग्रंथाचे आणि शहाजी वार्ता या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. ए. बी. शेळके, डॉ. ए. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सभापती अश्विनी धोत्रे, ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, धैर्यशील देसाई, उदय पाटील, सत्यजित पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, उदयानी साळुंखे, इंद्रजित बोंद्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
चौकट
कार्यकर्त्यांचा भावपूर्ण सत्कार
संयोजकांनी यावेळी आठवणीने बोंद्रे यांच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आयोजित केलेला भावपूर्ण सत्कार सर्वांबद्दलच एक वेगळी कृतज्ञतेची भावना व्यक्त करून गेला. दादांच्या पत्नी मालती यांच्या सत्कारावेळी सर्वांनीच टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांना मानवंदना दिली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे, समाजकल्याण सभापती नामदेवराव कांबळे, बाबासाहेब पाटील-भुयेकर यांच्यासह सुमारे ४० जुन्या कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
चौकट
आता प्रत्येकाला काही तरी पाहिजे
नेत्यावरील निष्ठा सांगताना पी. एन. पाटील म्हणाले, बोंद्रेदादा यशवंतराव चव्हाण यांना पाया पडताना चप्पल काढून, टोपी काढून पाया पडायचे आणि चव्हाणसाहेबही त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यायचे. आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केले, महापौर केलेे, चेअरमन केले तरी पुढच्या निवडणुकीला तो बरोबरच असेल याची खात्री देता येत नाही. प्रत्येक वॉर्डात आता नेता तयार आहे आणि त्यांना काही तरी पाहिजे आहे. दादा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचारावेळी जेवणाची सोय गावागावांतील लोक करायचे. आता आम्हाला लोकांना जेवण घालायला लागत आहे.
२८१२०२० कोल श्रीपतराव बोंदरे
श्रीपतराव बोंद्रे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभामध्ये शाहू छत्रपती, आमदार पी. एन. पाटील आणि खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते ‘आठवणीतील दादा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डावीकडून राहुल पाटील, मानसिंग बोंद्रे, डॉ. आर. के. शानेदिवाण, अश्विनी धोत्रे उपस्थित होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)