श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा, अभिनेत्यामधील संवेदनशील कार्यकर्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:59 AM2019-12-19T11:59:00+5:302019-12-19T12:01:46+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांना विचारांची नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. यानिमित्ताने अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, कलारसिक असे डॉ. लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींनी अनुभवले.
कोल्हापूर : आपल्या सशक्त अभिनयाने तमाम रसिकमनांवर अधिराज्य केलेले नटसम्राट, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्यातील हळव्या मनाचा आणि संवेदनशील माणूस कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्राने अनुभवला. पुरोगामी विचारसरणीचे डॉ. लागू कलेप्रमाणेच चळवळीतही रमले. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांना विचारांची नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. यानिमित्ताने अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, कलारसिक असे डॉ. लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींनी अनुभवले.
एक कलाकार म्हणून डॉ. लागूंची कारकिर्द अत्युच्च होती; पण कार्यकर्त्याचे साधेपण त्यांनी अखेरपर्यंत जपले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम केले. ‘परमेश्वराला रिटायर करा’ या संवादात्मक कार्यक्रमातून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधायचे.
याबाबत डॉ. मेघा पानसरे म्हणाल्या, त्यावेळी मी विद्यार्थिदशेत होते आणि स्टुडंट्स फेडरेशनची कार्यकर्ती होते. या काळात डॉ. लागू यांच्या अनेक कार्यक्रमांना जाण्याचा योग आला. त्यांचे विचार कळले. ज्या पद्धतीने ते विवेक आणि विज्ञाननिष्ठ पद्धतीने समजावून सांगायचे, ते ऐकून त्या काळात आम्ही अक्षरश: भारावून गेलो होतो. ते इतके साधे होते की कोणीही, कोणत्याही विषयावर त्यांना जाऊन प्रश्न विचारू शकत होते. लहान-मोठा, विद्यार्थी असा कोणताही भेद न करता ते सगळ्यांशी गप्पा मारायचे.
अनेकदा नाटकांच्या दौऱ्यानिमित्त डॉ. लागू कोल्हापुरात यायचे. रंगमंचावर काम करणाऱ्या आणि बॅकस्टेजच्या कलाकारांचीही ते विचारपूस करायचे. त्यावेळी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचीही ते किती दखल घेतात, हे लक्षात आल्याचे रंगकर्मी सांगतात. नाट्यवितरक आनंद कुलकर्णी म्हणाले, डॉ. लागू यांच्या अनेक नाटकांचे दौरे आम्ही आयोजित केले. त्यांच्यासारख्या मोठ्या अभिनेत्याची सोय कशी होते, त्यांना दौऱ्यात काही त्रास होणार नाही ना, याचे दडपण आमच्यावर होते. ते येत होते; पण त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते.
विजय टिपुगडे म्हणाले, दिल्लीत १९९८ साली कोल्हापूरच्या कलाकारांचे ‘कलापूर’ हे चित्रप्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनास डॉ. श्रीराम लागू यांनी आवर्जून भेट दिली. त्याप्रसंगी त्यांच्यासोबत डॉ. नरेंद्र दाभोलकरही होते. सर्व कलाकारांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या निमित्ताने एका कलारसिक डॉ. लागू यांचे वेगळेच दर्शन झाले.