शिरोळचा पूर वाढणार

By admin | Published: August 8, 2016 12:37 AM2016-08-08T00:37:02+5:302016-08-08T00:37:02+5:30

कोयना, वारणा धरणांतील विसर्गाचा परिणाम : अलमट्टी धरणातील पाण्याचे नियोजन सुरू

Shrod floods will increase | शिरोळचा पूर वाढणार

शिरोळचा पूर वाढणार

Next

जयसिंगपूर : राधानगरी, वारणा व कोयना धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने शिरोळ तालुक्यातील कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. त्यातच कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यात पूर परिस्थिती आणखी बिकट होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोयना व अलमट्टी धरणातील पाण्याचे नियोजन साधले जात आहे.
आठवडाभर झालेल्या पावसामुळे तालुक्यातील कृष्णेसह पंचगंगा, वारणा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत दुसऱ्यांदा झपाट्याने वाढ झाली. नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे नदीकाठची शेती पुन्हा पाण्याखाली गेली आहे. नृसिंहवाडी येथे दुसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा झाला. गेल्या दोन दिवसांत पावसाने उसंत घेतली असली तरी राधानगरी, वारणा व कोयना धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. रविवारी कोयना धरणातून १७ हजार १११ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे, तर वारणा धरणातून १८ हजार तसेच राधानगरी धरणातून बावीशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूझाला आहे. यामुळे तालुक्यावर पुराच्या पाण्याचे संकट आणखीन वाढणार आहे.
पाऊस कमी झाला असलातरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे येत्या दोन दिवसांत तालुक्यातील कृष्णेसह, दूधगंगा, पंचगंगा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे. याचा परिणाम १२ आॅगस्टला होणाऱ्या कन्यागत महापर्वकालावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविवारी सायंकाळी पाच
वाजता उदगांव-अंकली पुलावर कृष्णेची पाणी पातळी ३९ फूट, कुरुंदवाड दिनकरराव यादव पुलाजवळ पंचगंगेची पाणी पातळी ५८ फूट, तर राजापूर बंधाऱ्यावर कृष्णेची पाणी पातळी ४५ फूट होती. अलमट्टीचा विसर्ग कमी
कर्नाटकातील अलमट्टी धरणात शनिवारपर्यंत २ लाख ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, रविवारी तो विसर्ग कमी करून १ लाख ६२ हजार २३० ठेवण्यात आला. दरम्यान, कोयना व वारणा धरणांतून पाणी सोडण्यात आल्यामुळे शिरोळ तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. कन्यागतच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ते नियोजन साधले जात आहे. मात्र, आलमट्टीचा विसर्ग वाढणे गरजेचे आहे.
पुराचे पाणी वाढणार
सांगली, सातारा व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच सातारा येथे बैठक झाली. या बैठकीत कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत सविस्तर चर्चा झाली. अलमट्टी धरणातील पाण्याबाबत नियोजन करण्याचे यावेळी ठरले असले तरी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.
नृसिंहवाडीला पुराचा वेढा
नृसिंहवाडी : नृसिंहवाडी परिसरात शनिवारपासून पावसाने उसंत घेतली असली तरी धरणक्षेत्रातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा-पंचगंगा नदीपात्रात गेल्या चोवीस तासांत चार फुटाने वाढ झाली आहे. पाणी वाढल्याने येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.
रविवारी नृसिंहवाडी परिसरात पावसाने थोडी उघडीप दिली आहे. नृसिंहवाडी गावाच्या तीनही बाजूला नदी असल्याने पाण्याच्या पुराने गावाला वेढण्यास सुरुवात केली आहे. येथील बाबर प्लॉटमधील रामनगर येथील काही भागातील घरांत पाणी शिरल्याने लोक स्थलांतर करत आहे. वाढलेले पाणी देवसंस्थानचे अन्नछत्र, धार्मिक विधीगृह येथे शिरले असून प.प. टेंबे स्वामी महाराज नवे देवळाजवळ नदीचे पाणी आले आहे.
दरम्यान, श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे होणारा कन्यागत महापर्वकाल सोहळा व पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी एन.डी.आर.एफ.चे सेकंड कमांडंट वैरव नाथन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने भेट देऊन पाहणी केली.
इचलकरंजीत पंचगंगा इशारा पातळीवर
इचलकरंजी : सलग दोन दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी राधानगरी, चांदोली आणि कोयना धरणांतून पाणी सोडण्यात आल्यामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे नदीकाठच्या अकरा कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. यातील पाच कुटुंबे खासगी ठिकाणी, तर सहा कुटुंबांचे पूरग्रस्त छावणीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.
रविवारी दिवसभर अगदी तुरळक पाऊस पडला; मात्र धरणातून विसर्ग सुरू असल्याने दिवसभरात दीड फुटाने पाणी पातळी वाढून ६८ फुटांवर पोहोचली आहे. शहरातील ६८ फूट ही इशारा, तर ७१ फूट धोका पातळी प्रशासनाने निश्चित केली आहे.

Web Title: Shrod floods will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.