शिरोळला ग्रामपंचायतींचे धुमशान
By admin | Published: November 17, 2014 11:39 PM2014-11-17T23:39:17+5:302014-11-17T23:53:55+5:30
३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका : राजकीय संदर्भ बदलणार
संदीप बावचे - शिरोळ --लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता शिरोळ तालुक्याला मे २०१५ मध्ये होणाऱ्या ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. मिनी विधानसभा म्हणून होणाऱ्या या ग्रामपंचायतींच्या नव्या प्रभाग रचनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. नेहमी गट-तट पातळीवर होणाऱ्या या निवडणुका विधानसभेनंतर कशा पद्धतीने होणार, या गटा-तटालाही राजकीय रंग कसा येणार, याची उत्सुकता आतापासूनच लागून राहिली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका या चौरंगी झाल्या. जातीय समीकरणाचा चांगलाच रंग निवडणुकीत दिसून आला. मे २०१५ मध्ये शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, बस्तवाड, शेडशाळ, गणेशवाडी, आलास, घोसरवाड, तेरवाड, बुबनाळ, मजरेवाडी, निमशिरगाव, उदगाव, तमदलगे, जैनापूर, शिरदवाड, गौरवाड, शिरटी, जुने दानवाड, कवठेगुलंद, हसूर, घालवाड, टाकळीवाडी, कुटवाड, अर्जुनवाड, चिपरी, नांदणी, यड्राव, धरणगुत्ती, कोंडिग्रे, कोथळी, दत्तवाड, जांभळी, दानोळी व शिरढोण अशा ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे रणांगण पेटणार आहे.
निवडणूक आयोगाकडून लवकरच प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मे २०१५ मध्ये ३३ ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार असल्यामुळे प्रभाग रचनेचा आदेश येताच निवडणूक विभागातून त्याबाबत कार्यवाही सुरू होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींत निम्म्या जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर झाल्याने नेते जोमात अन् कार्यकर्ते कोमात अशी अवस्था झाली होती. ईर्ष्येचे राजकारण मोठ्याप्रमाणात दिसून आले. जिल्ह्यात शिरोळ तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. विधानसभेतील इतिहासानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही तालुका नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहेत.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हटले की, स्थानिक गटा-तटाचे राजकारण पेटते. सध्या राजकीय समीकरणे तालुक्यात बदलल्यामुळे आगामी होणाऱ्या ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राजकीय संदर्भ बदलण्याची शक्यता आहे. स्थानिक गटा-तटांतर्गत विळ्या-भोपळ्याचे पाहायला मिळणारे राजकारण या निवडणुकीत कोणते वळण घेणार, याबाबतही उत्सुकता आहे. माजी आमदार सा. रे. पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, आदींची भूमिका व राजकीय डावपेच कशापद्धतीने आखले जातात, यावरच बरेच काही अवलंबून राहणार आहे. या निवडणुकीत आ. उल्हास पाटील यांच्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. एकूणच मिनी विधानसभा निवडणुकीची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. तत्पूर्वी होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बॅँक व गोकुळ दूध संघ या निवडणुकांकडेही लक्ष लागून राहिले आहे.