Kolhapur: ऊस तोडणी मजुराचा मुलगा उपनिरीक्षकपदी, राज्यात खुल्या गटातून २० वा क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 12:24 PM2024-08-02T12:24:25+5:302024-08-02T12:25:34+5:30
सहा महिन्यांतील स्पर्धा परीक्षेतून हे दुसरे पद मिळविले
सोळांकुर : वडील अल्पभूधारक, ऊसतोड मजूर कामगार व घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे कमवा व शिकवा यामध्ये काम करीत सुळंबी (ता. राधानगरी) येथील शुभम पिराजी पाटील याने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. मुलाच्या यशाने आई- वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरंगले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षेत त्याची राज्यात खुल्या गटातून २० व्या क्रमांकाने निवड झाली आहे. सध्या तो आरोग्यसेवक म्हणून सीपीआर रुग्णालय येथे कार्यरत आहे. त्याने सहा महिन्यांतील स्पर्धा परीक्षेतून हे दुसरे पद मिळविले आहे.
त्याचे प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण सोळांकुर येथे झाले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी कमवा व शिकवा यातून आपला अभ्यास चालू केला होता. कोणतीही अकॅडमी अथवा शिकवणी न लावता घरीच अभ्यास करून यश खेचून आणले. वडील ऊस तोडणी कामगार, तर आई रोज दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरीचे काम करते.