शिरोळ तालुक्यात पहिल्या दिवशी शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:23 AM2021-05-11T04:23:33+5:302021-05-11T04:23:33+5:30
शिरोळ / जयसिंगपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी शिरोळ तालुक्यात कडक लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी ...
शिरोळ / जयसिंगपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी शिरोळ तालुक्यात कडक लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सोमवारी तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी केली जात होती. नेहमी नागरिकांची वर्दळ राहणारे चौक व रस्ते निर्मनुष्य होते. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी आणखी कठोर निर्बंधांची गरज आहे.
तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बैठक घेऊन दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. सोमवारी कडक लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरोना रुग्णांची संख्या कमी करायची असेल तर नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा बनला आहे. सोमवारी चौका-चौकात वाहनांची चौकशी केली जात होती. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई सुरू असली तरी नागरिकांनीही नियमांचे पालन करणे तितकेच गरजेचे बनले आहे.
शिरोळमध्ये कडक निर्बंध सुरू
शहरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता, पालिका प्रशासनाने दहा दिवस कडक लॉकडाऊनचे निर्बंध घालत असताना, केवळ मेडिकल व दवाखाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये दूध संकलन सुरू ठेवण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले आहे.
जयसिंगपुरात कडक निर्बंधाची गरज
शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे पालिका व पोलीस प्रशासनाने कडक निर्बंध लावण्याची गरज आहे. सोमवारपासून कडक लॉकडाऊन केले असले तरी, जयसिंगपूर शहरात अजूनही काहीजण रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कडक निर्बंध लावण्याची गरज आहे.
फोटो - १००५२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ -
शिरोळ येथे सोमवारी शिवाजी चौकात शुकशुकाट होता, तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पालिका व पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.