जयसिंगपूर शिरोळसह तालुक्यात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:25 AM2021-04-22T04:25:12+5:302021-04-22T04:25:12+5:30
जयसिंगपूर / शिरोळ : कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार शासनाने सकाळी सात ते अकरा या वेळेतच अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय ...
जयसिंगपूर / शिरोळ : कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार शासनाने सकाळी सात ते अकरा या वेळेतच अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी जयसिंगपूरसह शिरोळ तालुक्यात सकाळी चार तास वगळता इतरवेळी शुकशुकाट होता. रस्ते निर्मनुष्य झाले होते. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत.
गर्दी कमी करा, कोरोनाची साखळी तोडा, अशी भूमिका घेऊन सरकारने लॉकडाऊन घोषित केले होते. या ना त्या कारणाने लोक रस्त्यावर दिसत होते. सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आले होते. तरीदेखील रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने पुन्हा कडक नियम लागू करून सकाळी सात ते अकरा यावेळेत अत्यावश्यक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी पहिल्या दिवशी व्यापारी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर रस्ते निर्मनुष्य होते. बाजारपेठा बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. त्यातच शासकीय सुटी असल्याने अनेकांनी घरातच राहणे पसंत केले. ग्रामीण भागातील चित्रही असेच पाहावयास मिळाले. दरम्यान, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर विनाकारण घराबाहेर न पडता नागरिकांनी शिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
फोटो - २१०४२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील बसस्थानकावर शुकशुकाट होता.