शिरोळ येथे लसीकरण केंद्रावर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:22 AM2021-05-22T04:22:08+5:302021-05-22T04:22:08+5:30
शिरोळ : लाभार्थी लाखाच्या घरात... लसीकरण मात्र हजारात, असे चित्र काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे. लसीचा अपुरा पुरवठा होत ...
शिरोळ : लाभार्थी लाखाच्या घरात... लसीकरण मात्र हजारात, असे चित्र काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे. लसीचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यातच शुक्रवारी केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण ठप्प झाले होते. मागणीनुसार लसीचा पुरवठा होत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे.
शिरोळ तालुक्यात लसीकरणासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. त्याला चांगला प्रतिसाददेखील मिळाला आहे. मात्र, मागणीप्रमाणे लसीचा पुरवठा होत नसल्याने अडचणी येत आहेत. ४५ वयोगटापुढील लसीकरण जवळपास ७० टक्केच्या घरात पोहोचले आहे. सध्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण पूर्णत: बंद असल्याने तरुणांचे लसीकरण कधी होणार, याचीही चिंता ज्येष्ठांना लागून राहिली आहे.
एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब बनली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनदेखील सुरू आहे. मात्र, अपुऱ्या लसीमुळे नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे. तीन दिवसांपासून जिल्हा पातळीवरून लस उपलब्ध झालेली नाही. आणखीन तीन दिवस लसीची वाट पहावी लागणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
फोटो - २१०५२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिरोळ येथील लसीकरण केंद्रावर लस नसल्यामुळे शुकशुकाट होता. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)