सकाळी शुकशुकाट, दुपारनंतर रांगाच रांगा

By admin | Published: November 2, 2015 12:42 AM2015-11-02T00:42:34+5:302015-11-02T00:42:34+5:30

शांततेत मतदान : एस्तेर पॅटन केंद्रावर निर्धारित वेळेनंतरही २५० जणांचे मतदान

Shukushkat in the morning; | सकाळी शुकशुकाट, दुपारनंतर रांगाच रांगा

सकाळी शुकशुकाट, दुपारनंतर रांगाच रांगा

Next

कोल्हापूर : सकाळपासून तुरळक गर्दी, शुकशुकाट; पण सायंकाळी गर्दीने मतदारांच्या रांगा असे दिवसभराचे चित्र नागाळा पार्क विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या अकरा प्रभागांत दिसत होते. शेवटच्या तासाभरात मात्र मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. एकंदर या अकरा प्रभागांत शांततेत मतदान झाले असले तरीही पैशांचा महापूर वाहिला होता.
सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. त्याच वेळी प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मतदारांना स्लिप देण्यासाठी टेबलांची मांडणी करण्यात कार्यकर्ते मग्न होते. त्यानंतर सकाळी आठ वाजल्यानंतर उमेदवारांची सर्व यंत्रणा सज्ज झाली. सर्व उमेदवार सहकुटुंब मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदारांना आपल्यालाच मत देण्याचे आवाहन करीत होते. प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी तुरळक गर्दी, दुपारी शुकशुकाट, तर शेवटच्या दोन तासांत रांगा लागल्या. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सर्वच भागांत २५ टक्के मतदान झाले होते; तर त्याच वेळी बिंदू चौक आणि ट्रेझरी या दोन प्रभागांत मतदारांची गर्दी होती. यावेळी तेथे सुमारे ५० टक्के मतदान झाले होते. या दोन्हीही प्रभागांत चुरशीची लढत असल्याने येथे मतदानाची टक्केवारी वाढणार, हे निश्चितच होते.
कॉमर्स कॉलेज प्रभागात मात्र अत्यंत मंदगतीने मतदान सुरू होते. येथे मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. दुपारी चार वाजेपर्यंत येथे फक्त ४५ ते ५० टक्केच मतदान झाले होते.
कनाननगर प्रभागात तीन माजी नगरसेवकांत चुरस असल्याने त्या प्रभागातील मतदान दुपारपर्यंत संथपणे सुरू होते. दुपारनंतर झोपडपट्टीतील मतदार गर्दीने बाहेर पडल्याने मतदान केंद्रावर तुडुंब गर्दी झाली. अक्षरश: एस्तर पॅटन या शाळेवरील मतदार केंद्रावर मतदारांच्या लांबच्या-लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मतदानाची वेळ संपली तरीही सुमारे १०० हून अधिक पुरुष आणि १५० पेक्षा अधिक महिलांच्या रांगा लागल्या होत्या. त्यांना वेळ संपल्यानंतर चिठ्ठ्या देऊन रांगेत उभे केले. त्यानंतर आलेल्या मतदारांना मताचा अधिकार दिला नाही. त्यामुळे रात्री आठ वाजता या मतदान केंद्रावर मतदान पूर्ण झाले. (प्रतिनिधी)
पतंग उडवीत होते....
कनाननगर प्रभागात कमालीची चुरस होती. याचे मतदान केंद्र हे एस्तेर पॅटन शाळेत होते. यातील एका उमेदवाराचे निवडणूक चिन्ह हे पतंग होते. त्यामुळे याच शाळेच्या मैदानावर, परिसरात सुमारे १० ते १२ कार्यकर्ते दिवसभर पतंग उडवीत होते. त्यामुळे हवेत आकाशात काही उंचीवरच अनेक पतंग उडताना दिसत होते; पण त्यावर कोणालाही आक्षेप घेण्यात अडचण होती. साडेपाच नंतर मात्र हे सर्व पतंग गायब झाले.
पैशांचा महापूर
प्रत्येक प्रभागात पक्षांच्या उमेदवारांकडून पैशांचा महापूर सोडला जात होता. उमेदवारांकडून पैसे घेऊन मतदान करणाऱ्यांची संख्या अधिक होती. अनेक मतदान केंद्रांनजीकच उमेदवारांचे समर्थक पैसे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी धावाधाव करीत होते. त्यामुळे अनेक मतदारांंनी सर्वच उमेदवारांकडून पैसे घेऊन आपल्या पसंतीने मतदान केल्याचे दिसून आले.

Web Title: Shukushkat in the morning;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.