इचलकरंजीत आज दुकानांचे शटर अप की डाऊन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:18 AM2021-06-28T04:18:00+5:302021-06-28T04:18:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंदच आहेत. व्यापाऱ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंदच आहेत. व्यापाऱ्यांनी प्रशासनासोबत अनेकवेळा विनंती, निवेदन, चर्चा, बैठकांचा मार्ग अवलंबला. मात्र, प्रशासनाने व्यापाऱ्यांना कोणतीही सवलत दिली नाही. व्यापारी हतबल झाल्याने त्यांनी दुकाने उघडण्यासाठी प्रयत्न केला; पण तो साध्य होऊ शकला नाही. त्यामुळे आज (सोमवारी) व्यापारी आपली दुकाने उघडणार की बंदच ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या आत असतानाही निर्बंध शिथील केले जात नसल्याने शहरातील व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे. पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या आत असूनही जिल्ह्याला चौथ्या श्रेणीतील निर्बंध लागू केल्याने व्यापारी हैराण झाले आहेत. त्यामुळे व्यापारी दुकाने उघडण्यावर ठाम आहेत, तर प्रशासनाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे व्यापारी आपल्या भूमिकेशी ठाम राहत दुकाने उघडतात की बंद ठेवतात, यावर प्रशासन कोणती कार्यवाही करणार, हे पाहावे लागेल.