शटर बंद पण दुकाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:08+5:302021-06-11T04:17:08+5:30
कोल्हापूर : शहर आणि परिसरात गुरुवारी दिवसभर दुकाने सुरू राहिली. अनेक दुकानदारांनी अर्धे शटर उघडून व्यापार केल्याचे पाहायला मिळाले. ...
कोल्हापूर : शहर आणि परिसरात गुरुवारी दिवसभर दुकाने सुरू राहिली. अनेक दुकानदारांनी अर्धे शटर उघडून व्यापार केल्याचे पाहायला मिळाले. कारवाई झाली तरी हरकत नाही, पण जगण्यासाठी आता दुकान सुरूच करायचे, अशा मानसिकतेतून अनेकजणांनी व्यापार सुरू केला. दरम्यान, सरसकट सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळण्यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजतर्फे लोकप्रतिनिधींतर्फे प्रयत्न केले जात आहेत.
गुरुवारी दिवसभर शहरातील बहुतांशी दुकाने अर्धे शटर उघडून सुरू ठेवली होती. शहरातील लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शिवाजी मार्केट, महाव्दार रोड परिसरात असे चित्र पाहायला मिळाले. पूर्णपणे दुकाने बंद ठेवून नुकसान सोसण्यापेक्षाप्रसंगी दंड भरू, पण दुकान सुरू ठेवू अशी अनेक दुकानदारांची मानसिकता होत असल्याचे, चेंबरच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याच मानसिकतेतून अनेक दुकाने सुरू राहिली. अनेकजण महापालिकेकडून कारवाईचा बडगा टाळण्यासाठी अर्धे शटर उघडून व्यवसाय करीत आहेत. दुकानाच्या दारात माणूस उभा करायचा, ग्राहक आत घ्यायचे..खरेदी झाली की फोन करून दारात कोण आहे का हे विचारायचे व हळूच ग्राहकाला बाहेर सोडायचे असा व्यवहार सुरू आहे. मात्र अजूनही कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. सरकारकडून आदेश आल्याशिवाय सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी न देण्यावर जिल्हा प्रशासन ठाम आहे.
दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा, वस्तू वगळता इतर दुकाने बंद आहेत. प्रामुख्याने कपडे, फुटवेअर अशी दुकाने बंद राहिल्याने संबंधित दुकानदारांत असंतोष आहे. पावसाला प्रारंभ होण्याआधी दुकानातील शिल्लक मालाची विक्री करण्याचे नियोजन अनेक व्यापाऱ्यांनी केले आहे. पण सरकार आणि जिल्हा प्रशासन सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली नाही. याविरोधात बुधवारी व्यापारी रस्त्यावर उतरून लक्ष वेधले. शहरातील आमदार, खासदार, जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी मिळण्यासाठी ‘चेंबर’चे पदाधिकारी धडपडत आहेत. दोन दिवसात पालकमंत्री सतेज पाटील यांचीही ते भेट घेणार आहेत.
कोट
कारवाई झाली तरी चालेल पण दुकाने सुरू करायची, अशी मानसिकता अनेक व्यापारी, दुकानदारांची होत आहे. दोन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने ते हतबल आणि अगतिक बनले आहेत. आर्थिक अडचणीतही आले आहेत. म्हणून प्रशासनाने कोरोना प्रतिबंधाच्या नियमाचे पालन करत सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी.
संजय शेटे,
अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज