किराणा दुकानाचे शटर डाऊन, दारूचे मात्र ओपन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 06:07 PM2021-03-31T18:07:39+5:302021-03-31T18:10:20+5:30
corona virus Kolhapur- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर सर्व अस्थापना रात्री आठ नंतर बंद करण्याचा आदेश दिला; पण दारूची दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे सिनेमागृह, मॉल, रेस्टॉरंट व सर्व प्रकारच्या दुकानांचे शटर रात्री आठनंतर डाऊन पण दारूची दुकाने मात्र रात्री १० पर्यंत खुली अशी अवस्था झाली आहे.
कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर सर्व अस्थापना रात्री आठ नंतर बंद करण्याचा आदेश दिला; पण दारूची दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे सिनेमागृह, मॉल, रेस्टॉरंट व सर्व प्रकारच्या दुकानांचे शटर रात्री आठनंतर डाऊन पण दारूची दुकाने मात्र रात्री १० पर्यंत खुली अशी अवस्था झाली आहे.
जमावबंदी आदेश पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येऊ नयेत यासाठी शासनाने काढलेला आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी व्यापारी, दुकानदारांनी रात्री आठ वाजता दुकाने बंद करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यामध्ये सर्व प्रकारच्या दुकानांसह रेस्टॉरंट, मॉल, सिनेमागृहांचाही समावेश आहे. रेस्टॉरंट अगर बिअर बार रात्री आठ वाजता बंद करण्याचे आदेश असले तरीही पार्सल सुविधा मात्र रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहिली आहे.
गेले तीन दिवस महापालिका, पोलीस प्रशासनाने या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी रात्री आठनंतर सर्वच आस्थापना, दुकाने बंद ठेवण्यासाठी भाग पाडले आहे. त्यानुसार सर्व व्यवहार रात्री आठनंतर बंदही केले जात आहेत; पण आदेशात स्पष्टता नसल्याने व्यापाऱ्यांच्या संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
दिवसभर कडक उन्हामुळे कोणत्याही दुकानात फारशी ग्राहक नसल्याने सायंकाळी सात वाजल्यानंतर ग्राहक मोठ्या संख्येने दुकानात जाऊ लागले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट तसेच बिअर बारमध्ये तर रात्री आठनंतरच ग्राहक जातो; पण या वेळेतच हे सर्व बंद करण्याचे आदेश निघाल्याने व्यावसायिक संतापले आहेत. दंडाचा भुर्दंड नको म्हणून हे दुकानदार स्वत:हून रात्री आठनंतर व्यवसाय बंद ठेवत आहेत.
हा आमच्याकडील आदेश
सर्वसामान्याला गरजेच्या वस्तू दुकानातून खरेदी कराव्या लागतात. त्याच वेळी ही दुकाने बंद होतात; पण शेजारील दारूचे दुकान मात्र उघडे असल्याने नागरिकांतून संभ्रमावस्था निर्माण होत आहे. पोलीस जमावबंदी आदेशानुसार दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना दारू दुकानदार हे आपल्याकडील रात्री १० वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याच्या आदेशाची प्रत दाखवितात. त्यावेळी पोलीस प्रशासनाकडे दारू दुकाने बंद करण्याबाबतचा स्वतंत्र आदेश नसल्याने पोलीसही कारवाई करताना संभ्रामावस्थेत पडल्याचे दिसून येत आहे.