‘शविआ’ची कॉँग्रेसवर कुरघोडी

By admin | Published: November 9, 2015 11:05 PM2015-11-09T23:05:34+5:302015-11-09T23:21:48+5:30

इचलकरंजी नगरपालिकेत कलगीतुरा : शहर विकास आघाडी अल्पसंख्य असूनही काँग्रेसला त्रासदायक

'Shwa'i's Congress' Kurghadi | ‘शविआ’ची कॉँग्रेसवर कुरघोडी

‘शविआ’ची कॉँग्रेसवर कुरघोडी

Next

राजाराम पाटील -- इचलकरंजी --बहुमत कॉँग्रेसचे, पण अल्पसंख्य असूनही पालिकेचा कारभार शहर विकास आघाडीकडे. अशी काहीशी विचित्र परिस्थिती इचलकरंजी नगरपालिकेची झाली आहे. त्यामुळे पालिकेची सभा बोलावणे आणि नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावरील प्रस्तावित अविश्वास ठराव यावरून ‘शविआ’ व कॉँग्रेसमध्ये शह-काटशहचे राजकारण रंगले आहे. आणि त्यानिमित्ताने दोन्ही पक्षाच्या प्रमुखांमध्ये होणारा कलगी-तुरासुद्धा रंजक ठरतो आहे.
नगरपालिकेमध्ये असलेल्या ५७ नगरसेवकांपैकी २९ नगरसेवक कॉँग्रेसचे, ११ नगरसेवक राष्ट्रवादीचे आणि १७ नगरसेवक ‘शविआ’चे असे बलाबल आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी अशी युती पालिकेत सत्तेवर आहे. या दोघांचे मिळून ४० आणि शहर विकास आघाडीचे १७ असे संख्याबळ दिसते आहे. मात्र, जानेवारी महिन्यामध्ये नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी राजीनामा दिला नाही आणि बंड केले. त्यांच्या या कृतीला ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. तेव्हा कॉँग्रेसकडे बहुमत असले तरी नगराध्यक्षांवर अविश्वास आणण्यासाठी आवश्यक असलेला ४३ सदस्यांचा संच नसल्यामुळे बिरंजे यांच्यावर अविश्वास आणता आला नाही, अशा कोंडीत कॉँग्रेस पक्ष सापडला. त्यामुळे बिरंजे यांच्याबरोबर पालिकेच्या कामकाजात मिळते-जुळते घेणे कॉँग्रेसला भाग पडले.
या घटनेला दहा महिने उलटले तरी शहर विकास आघाडी, पर्यायाने नगराध्यक्षा बिरंजे यांच्याकडून कॉँग्रेसच्या नगरसेवक-नगरसेविकांना सहकार्य मिळत नाही. त्यांच्या प्रभागातील विकासकामांना खीळ बसली आहे. अशा भूमिकेतून आता कॉँग्रेसने नगराध्यक्षांना अडचणीत आणण्याचे ठरविले आहे. त्याचीच एक खेळी म्हणून नगराध्यक्षांनी शनिवारी आयोजित केलेली विशेष सभा कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील जांभळे गटाने अनुपस्थित राहून रद्द केली. त्यानिमित्ताने उभय पक्षाच्या पक्षप्रतोदांनी परस्परांवर आरोप केल्याने कलगी-तुरा रंगला आहे.
‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव म्हणाले, कॉँग्रेसने व्हिप लागू करून सभा रद्द केली. म्हणजे नगरसेवकांवर कॉँग्रेसच्या श्रेष्ठींचा विश्वास नाही, असा स्पष्ट अर्थ निघतो. नगरसेवकांनीच नव्हे, तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी विश्वास गमाविला असल्याचा यातून राजकीय अर्थ निघतो आहे. त्याचवेळी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील म्हणाले, शहरामधील रस्ते आणि पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
पाणी व रस्ते या कामांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे विषय कॉँग्रेसकडून नगराध्यक्षांना दिले. मात्र, त्यांच्या अध्यक्षीय दप्तरात पडून राहिले आहेत. याचा अर्थ नगराध्यक्षा कॉँग्रेसच्या असल्या तरी त्या कॉँग्रेस नगरसेवकांना डावलत आहेत, असे स्पष्ट होते. यावर नगराध्यक्षांनीसुद्धा पत्रकारांशी बोलताना मी कॉँग्रेसची असूनसुद्धा आपल्याला कोंडीत धरण्याचा प्रकार होत आहे आणि बिनबुडाचे आरोप कुणी करू नयेत. जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा दिला.

Web Title: 'Shwa'i's Congress' Kurghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.