आहे श्याम मनोहरीय तरी ...

By admin | Published: November 21, 2014 09:35 PM2014-11-21T21:35:05+5:302014-11-22T00:18:30+5:30

‘गायन समाज देवल क्लब’ या कोल्हापुरातील संघाचा राज्य नाट्य स्पर्धेत स्वत:चा असा एक पारंपरिक दबदबा

Is Shyam Manorahi Yet ... | आहे श्याम मनोहरीय तरी ...

आहे श्याम मनोहरीय तरी ...

Next

‘गायन समाज देवल क्लब’ या कोल्हापुरातील संघाचा राज्य नाट्य स्पर्धेत स्वत:चा असा एक पारंपरिक दबदबा. राज्य नाट्य स्पर्धेत ‘पूल’सारख्या नाटकाला पारितोषिक मिळवण्यापासून ‘गायन समाज देवल क्लब’चा राज्य नाट्य स्पर्धेतला जो प्रवास सुरू झाला तो अजूनही सातत्य राखून आहे. ‘देवल क्लब’च्या संघाने यापूर्वी राज्य नाट्य स्पर्धेत जसे काही उत्तम हिंदी नाटकांचे अनुवाद सादर केले त्याचप्रमाणे नव्या पिढीने श्याम मनोहरांची ‘अंधारात मठ्ठ काळा बैल’, ‘हृदय’, ‘यकृत’ यांसारखी नाटकेही रंगमंचावर आणली. श्याम मनोहरांच्या लेखनावर प्रेम करणारी पिढी आता प्रौढत्वाकडे झुकली असली तरी नव्या पिढीतही त्यांच्या लेखनशैलीविषयी आणि जीवनविषयक चिंंतन वेगळ्या प्रकारे मांडण्याविषयी औत्सुक्य कायम आहे. राज्य नाट्य स्पर्धेत ‘देवल क्लब’नं ‘प्रियंका आणि दोन चोर’ सादर करणं हे त्याचंच निदर्शक.‘प्रियंका आणि दोन चोर’ हे नाटक श्याम मनोहरांच्या इतर नाटकांच्या तुलनेत थोडेसे डावे ठरण्यासारखे आहे, कारण या नाटकात प्रत्यक्ष घटना अशा फार घडत नाहीत. जे काही घडतं ते संवाद, संवाद आणि संवादातून! साहजिकच नाटकाची दृश्यात्मकता वाढवण्यासाठी प्रमुख तीन पात्रांनी आपले अनुभव सांगण्यास सुरुवात करताच ते प्रसंग पुन्हा वेगळी पात्रे रंगमंचावर आणत सादर करण्याला पर्याय उरत नाही. या नाटकामध्ये हेच करण्यात आलेय. माणसानं नेहमी जे आपल्याला मिळालं त्यावर समाधानी राहण्यापेक्षा जे आपल्याला मिळत नाहीये त्याबद्दल निराश राहावं का? माणसाच्या प्रगतीचा मार्ग त्यातूनच सापडू शकतो का? - की माणसानं नेहमी गरीब राहावं म्हणजे छोट्यामोठ्या जीवनावश्यक बाबींची पूर्ततादेखील खूप आनंद देणारी ठरू शकते? या दोन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न श्याम मनोहरांनी ‘प्रियंका आणि दोन चोर’ या नाटकातून केला आहे. या नाटकातील प्रियंका म्हणजे तेजस्विनी देवणे एका बांधकामावरच्या वॉचमनची बायको. पदरात एक लहान पोर. नवऱ्याला दारूचे व्यसन. हातात पडणारी मिळकत अगदीच कमी म्हणजे हातावरचंच पोट. या प्रियंकाचं सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे आठ दिवसांचा बाजार एकावेळी •करणं. मोडक्या संसाराला थोडीशी मदत म्हणून रात्रीच्यावेळी राहण्यासाठी ती बांधकामाच्या जागी दोन तरुणांना आश्रय देते आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून माफक पैसेही घेते. आश्रयाला आलेले हे दोन तरुण म्हणजे चेन, मंगळसूत्र आणि हाताला लागेल ती किरकोळ चोरणारे चोर. आपण चोर वाटू नये, तसे दिसू नये म्हणून त्यांची राहणी मात्र टापटीप-टाय व बुटातली. यापैकी एकजण आपल्याला घालायला सोन्याची चेन हवी, पण ती दोन दिवसातल्या चोरीत मिळाली नाही म्हणून निराश, तर दुसरा मिळालेल्या पैशातून एक दारूची बाटली व बिर्याणी आणून तिचा आस्वाद घेत सुखी होऊ पाहणारा. प्रियंकाला खूप प्रयत्नानंतर आठ दिवसांचा बाजार एकावेळी •करणं शक्य झाल्यानं मनापासून आनंद झालेला, पण तो कुणापुढे व कसा व्यक्त करावा हेच कळत नाही आणि आनंद कोणाबरोबर वाटून घेता आला नाही तर त्या आनंदाला काय अर्थ आहे? - म्हणून प्रियंका पुन:पुन्हा या दोन चोरांच्या जवळ घुटमळत आपल्या पद्धतीनं आपला आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. हे करत असताना तिला आपण ज्या ज्या ठिकाणी काम केले तेथील बायकांचे किस्से आठवत राहातात. ती बडबड करत राहते. दोन चोरांनाही आपले काही अनुभव एकमेकाला सांगावेसे वाटतात आणि यातून चंगळखोर समाज आणि जीवनावश्यक वस्तूंसारख्या छोट्या बाबींमधून जगण्यातला आनंद शोधणारे समाजघटक यांचे चित्र प्रेक्षकांसमोर उभे केले जाते.
संपूर्ण प्रयोग सादर होत असताना प्रेक्षकांकडून जी दाद मिळाली ती वरवरच्या विनोदांना अधिक होती. नेपथ्य मोजके आणि नेमकी वातावरण निर्मिती करणारे आणि म्हणूनच दाद देण्याजोगे. प्रकाशयोजना व इतर बाबी ठाकठीक म्हणाव्यात अशा. प्रियंकाच्या भूमिकेतील तेजस्विनी देवणे यांनी आपली •भूमिका सहजतेने निभावताना चांगलीच छाप पाडली. केदार कुलकर्णी व दिगंबर पाटील यांनी खूप कष्ट घेतले आहेत. एकूण संघाचे प्रयत्न प्रामाणिक, पण पूर्णपणे पकड घेणारे किंवा नाटकाचा हेतू साध्य करण्यात यशस्वी म्हणता येण्यासारखे नव्हेत.


शाहू स्मारक भवनमध्ये गुरुवारी सादर झालेल्या ‘प्रियांका आणि दोन चोर’ नाटकातील एका प्रसंगात केदार कुलकर्णी, दिगंबर पाटील, तेजस्विनी देवणे.



५४ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

उदय कुलकर्णी

Web Title: Is Shyam Manorahi Yet ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.