‘श्यामची आई’चा लळा कायम
By admin | Published: June 10, 2015 11:52 PM2015-06-10T23:52:51+5:302015-06-11T00:14:58+5:30
अन्य साहित्याकडे मात्र पाठ : वर्षाकाठी १५ हजार पुस्तकांची विक्री
इंदुमती गणेश - कोल्हापूर -हॅरी पॉटर, स्पायडर मॅन, कार्टूनचे विश्व आणि कॉमिक्सच्या भूलभूलैयातही बालसंस्कार आणि शिक्षणाचा मूलभूत पाया असलेल्या साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाची आजही बालकांवर मोहिनी कायम आहे. कोल्हापुरात वर्षाकाठी ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या १५ हजारांहून अधिक प्रतींची विक्री होते. मात्र, दुसरीकडे साने गुरुजींच्या अन्य साहित्याकडे वाचकांनी पाठ फिरविली आहे.
संस्कार म्हणजे बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठ्यांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे; पण हे संस्कार एका पिढीतून दुस-या पिढीत रुजविण्यासाठीचा अनमोल ठेवा साने गुरुजी यांनी ‘श्यामची आई’च्या रूपाने लिहून ठेवला आहे. नाशिकला तुरुंगात असताना साने गुरुजींंनी आईच्या आठवणी पाच दिवसांत लिहून काढल्या. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढ्या संस्कारक्षम झाल्या. आईबद्दलचे असणारे प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात आहेत. हे पुस्तक पहिल्यांदा १९३५ साली प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या तीन लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत.
एकविसाव्या शतकात जीवनशैलीत बदल झाला असला तरी बालसंगोपनात संस्कारांची मूल्ये रुजविली जातात. म्हणूनच गेल्या ८० वर्षांत या पुस्तकाच्या खपावर परिणाम झालेला नाही. आजही शालेय विद्यार्थ्यांना भेट म्हणून याच पुस्तकाची मागणी केली जाते. कोल्हापुरात या पुस्तकाची वर्षाकाठी किमान १५ हजार प्रतींची विक्री होते. एकीकडे आजही या पुस्तकाचा विक्रमी खप असला तरी साने गुरुजींनी लिहिलेली अन्य बाल संस्कारक्षम पुस्तके व चळवळीत काम करतानाचे लेखन अशा अन्य साहित्याकडे मात्र वाचकांनी पाठ फिरविली आहे.
विक्री की वाचनही
‘श्यामची आई’, या पुस्तकाचा खप जास्त असला तरी त्याच्या वाचनाबद्दल संभ्रमावस्था आहे. पुस्तक वाचायचेच आहे, या उद्देशाने त्याची खरेदी होत नाही. विद्यार्थ्यांना बक्षीसरूपाने किंवा भेट म्हणून हे पुस्तक दिले जाते. संस्कार म्हणून हे पुस्तक मानदंड असले, तरी तत्कालीन भाषा आणि आज वापरल्या जाणाऱ्या भाषेत फरक असल्याने हे पुस्तक वाचण्यात उदासीनता असल्याचे काही प्रकाशकांचे मत आहे.
बालकुमार साहित्यामध्ये ‘श्यामची आई’ हे पुस्तक आजही आवर्जून वाचले जाते. पुस्तक जुने असले तरी त्यातील सुसंस्कार हे आजच्या काळाशीही सुसंगत असल्याने आजही प्रकाशनावर परिणाम झालेला नाही.
- अनिल मेहता,
मेहता पब्लिशिंग हाऊस