‘सिद्धाळा गार्डन’ची लढत ‘बहुरंगी’
By admin | Published: October 21, 2015 12:06 AM2015-10-21T00:06:22+5:302015-10-21T00:09:59+5:30
नातेवाइकांच्या मतांवर भिस्त : कोण-कोणाची मते खाणार यावर विजयाचे गणित
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील ‘सिद्धाळा गार्डन’ या प्रभागात सणगर गल्ली तालीम, बोडके तालीम, डाकवे गल्ली, बजाप माने तालीम, जासूद गल्ली, गुलाब गल्ली, शाहू बँकेसमोरील काही भागांत गठ्ठा मतदान असल्याने हे भागच निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून कल्पना चंद्रमोहन पाटील, भाजपकडून सुनंदा सुनील मोहिते, तर शिवसेनेकडून मंदा राजेंद्र पाटील व काँग्रेसच्या मयूरा राजू भोसले यांच्यातच खरी लढत आहे.
हा प्रभाग पूर्वी रवी इंगवले आणि संभाजी देवणे यांच्या प्रभागात विखुरलेला होता. २००५ मध्ये या भागाचे नेतृत्व बाबा पार्टे यांनी केले होते. सध्या राष्ट्रवादीच्या उमेदवार कल्पना पाटील यांचे पती चंद्रमोहन यांचा संबंध सणगर गल्ली, बोडके तालीम या परिसरात मोठा आहे. त्यात नातेवाइकांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे पाटील यांना या निवडणुकीत अधिक पसंतीची शक्यता आहे. बाबा पार्टे यांच्या स्नुषाही या प्रभागातून इच्छुक होत्या. मात्र, त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही. शिवसेनेकडून मंदा राजेंद्र पाटील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. गुलाब गल्ली, जासूद गल्ली येथील पाठिंब्यावर ताराराणी आघाडीकडून सुनंदा सुनील मोहिते याही रिंगणात उतरल्या आहेत. काँग्रेसकडून मयूरा राजू भोसले याही आपले नशीब आजमावत आहेत. अपक्ष म्हणून पार्टे यांच्या घराण्यातून श्रद्धा संतोष पार्टे आणि दुसऱ्या अपक्ष वैशाली गिरीष पाटील या रिंगणात आहेत. त्यांचे पती गिरीष ऊर्फ राजू हे शिवसेनेचे उपशहरप्रमुख आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मतांमध्ये विभागणीची शक्यता आहे. या सहाही उमेदवारांनी प्रचारावर जोर देत यावेळी विजय मिळवायचा अशी खूण गाठ बांधली आहे. त्यातील कल्पना पाटील, सुनंदा मोहिते, मंदा पाटील यांनी प्रचारफेऱ्यांवर भर दिला आहे, तर श्रद्धा पार्टे, वैशाली पाटील, मयूरा पाटील यांनी आपल्या नातेवाइकांसह वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. ( प्रतिनिधी)
लढत फक्त निवडणुकीपुरती...
मंगळवार पेठ खऱ्या अर्थाने ‘फुटबॉलपटू घडविणारी खाण’ म्हणून सर्वपरिचित आहे. प्रत्येकाची घरे अगदी खेटून आणि जुन्या कोल्हापूरची आठवण करून देणारी घरे आणि एकमेकांमध्ये असलेल्या वर्षानुवर्षांच्या सलोख्याच्या संबंधांमुळे निवडणूक कोणतीही असो, त्यातील वाद हे तात्त्विक व केवळ निवडणुकीपुरते असतात. त्यामुळे एकमेकांविरोधात लढणारी मंडळी निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येतात, अशी ख्याती या भागाची आहे.