साईडपट्ट्या बनल्या जीवघेण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:33+5:302021-08-26T04:25:33+5:30
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्याही वाहून गेल्या ...
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्याही वाहून गेल्या आहेत. साईड पट्ट्यांच्या जागी सहा ते सात फूट खोल खड्डेही पडल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. विशेष करून रात्रीच्या वेळी दोन ठिकाणी त्या खड्ड्यांत दुचाकी घेऊन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याअगोदर या साईडपट्ट्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. महिना उलटला तरी साईडपट्ट्यांच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम खाते मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे मोठ्या दुर्घटनेनंतरच या खात्याला जाग येणार का? असा सवालही लोकांमधून व्यक्त होत आहे. अनेक रस्त्यांमध्येही खड्डे पडले आहेत. त्यांचीही डागडुज्जी करावी, अशीही मागणी होत आहे.
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही प्रशासन गप्प
गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी तालुक्यात पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत अनेकांनी साईडपट्ट्यांची दुरुस्ती लवकर करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे पालकमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना करूनही कोणतीच हालचाल होत नाही.
फोटो ओळी : हलकर्णी गावाजवळ रस्त्यांच्या साईडपट्ट्यांची अशी दुरवस्था झाली आहे.
क्रमांक : २५०८२०२१-गड-०२