कोल्हापूर, कोकणात तब्बल आठ वाघांचे दर्शन, वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 11:23 AM2022-09-28T11:23:28+5:302022-09-28T11:23:52+5:30

महाराष्ट्र वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या वन्यप्राणीप्रेमी संस्थेने वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपिंगच्या सहकार्याने या वाघांच्या हालचाली टिपलेल्या आहेत.

Sighting of as many as eight tigers in Kolhapur, Konkan, recorded in forest department camera trap | कोल्हापूर, कोकणात तब्बल आठ वाघांचे दर्शन, वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद

कोल्हापूर, कोकणात तब्बल आठ वाघांचे दर्शन, वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद

googlenewsNext

कोल्हापूर : कोकणमार्गे कोल्हापुरात भ्रमंती करणाऱ्या तब्बल आठ वेगवेगळ्या वाघांचे दर्शन झाल्याच्या नोंदी व्याघ्र अभ्यासक आणि वन्यजीव जीवशास्त्रज्ञ गिरीश पंजाबी यांनी वर्षभरात नोंदविल्या आहेत. महाराष्ट्र वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या वन्यप्राणीप्रेमी संस्थेने वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपिंगच्या सहकार्याने या वाघांच्या हालचाली टिपलेल्या आहेत. एका वर्षाच्या कालावधीत घेण्यात आलेल्या या नोंदीमुळे दक्षिण कोकण आणि कोल्हापूर वनविभागाचा समावेश असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.

कर्नाटक आणि गोवा राज्यांतून अनेकदा कोकण आणि कोल्हापूर व्याघ्रभ्रमंती मार्गात हे वाघ येत होते. गव्यांची तसेच इतर जनावरांची शिकार वाघाकडून होत असल्याचा संशय रहिवाशांनी व्यक्त केला होता. त्यामुळे वाघांची हालचाल टिपण्यासाठी कोल्हापूर वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या वन्यप्राणीप्रेमी संस्थेने कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने मोहीम हाती घेतली. कोकणातील तिलारी, चंदगड, दोडामार्ग, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, दाजीपूर, आंबोली येथील दोन वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या संरक्षित क्षेत्रात हे ८ वाघ वावरताना शास्त्रज्ञांना दिसले. यापैकी वाघाची एक जोडी आता दक्षिण कोकणातील मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या जंगलात कायमस्वरूपी ठाण मांडून बसल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञ गिरीश पंजाबी यांनी नोंदवले.

गिरीश पंजाबी हे वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या संस्थेमार्फत २०१४ पासून कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून कोकणातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाघांच्या हालचालींची नोंद घेत आहेत. आठ वर्षांपासून वाघाची एक जोडी कोकणात कायमस्वरूपी राहत असल्याचे वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टचे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ गिरीश पंजाबी यांनी सांगितले होते. इतर सहा वाघांचे दर्शनही सातत्याने आढळून येत होते. मात्र त्याबद्दल ठोस पुरावा उपलब्ध झालेला नव्हता.

तब्बल २२ कॅमेरा ट्रॅपमध्ये केल्या नोंदी

गिरीश पंजाबी यांनी नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीत दक्षिण कोकण आणि कोल्हापूर वनविभागातील हद्दीत तब्बल २२ ठिकाणी प्रत्येकी एक कॅमेरा ट्रॅप बसवला होता. काही ठिकाणी दोन महिने तर काही ठिकाणी सहा महिने वाघांच्या हालचालींची नोंद या कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून घेण्यात आल्याची माहिती पंजाबी यांनी दिली.

या आठ वाघांच्या नोंदीमध्ये मार्च महिन्यात राधानगरीत आढळलेल्या वाघाचा समावेश आहे. हा वाघ स्थानिक नसला तरी अभयारण्यात ये-जा करत होता. या वाघाचा भ्रमणमार्ग राधानगरीपासून कोकणापर्यंत आहे. हा वाघांचा वावर वनविभागासाठी निश्चितच चांगली बाब आहे. - विशाल माळी, विभागीय वनाधिकारी, कोल्हापूर.
 

कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील या वाघांच्या हालचाली नोंदविण्यात यश आलेले आहे. कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पातील जो वाघ कोकण पट्ट्यांत येत होता, त्याचे मी यापूर्वीच कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून पुरावा दिला होता. वाघिणींची संख्या कमी असल्याने हा वाघ या भ्रमंती मार्गात फार काळ थांबत नव्हता. -गिरीश पंजाबी, वन्य जीवसंशोधक, वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट.

Web Title: Sighting of as many as eight tigers in Kolhapur, Konkan, recorded in forest department camera trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.