कोल्हापूर शहरात पुन्हा चार गव्यांच्या कळपाचे दर्शन, बचाव पथक सतर्क

By संदीप आडनाईक | Published: December 11, 2022 11:12 PM2022-12-11T23:12:50+5:302022-12-11T23:14:37+5:30

गेल्या महिन्यापासून कोल्हापूर शहरात गव्यांचे तीन वेगवेगळे कळप आढळले आहेत. नदीकाठचे ऊस आणि पाण्याची चांगली सोय असल्यामुळे हे गवे शहरात मध्यवस्तीत येऊ लागले आहेत.

Sighting of herd of four cows in Kolhapur city again, rescue team on alert | कोल्हापूर शहरात पुन्हा चार गव्यांच्या कळपाचे दर्शन, बचाव पथक सतर्क

कोल्हापूर शहरात पुन्हा चार गव्यांच्या कळपाचे दर्शन, बचाव पथक सतर्क

Next

कोल्हापूर : शहरातील खानविलकर पेट्रोलपंपामागे रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चार गव्यांच्या कळपाचे स्थानिक नागरिकांना पुन्हा एकदा दर्शन झाले. यामुळे वनविभाग सतर्क झाला असून, बचाव पथकाने नाकाबंदी केली आहे.

गेल्या महिन्यापासून कोल्हापूर शहरात गव्यांचे तीन वेगवेगळे कळप आढळले आहेत. नदीकाठचे ऊस आणि पाण्याची चांगली सोय असल्यामुळे हे गवे शहरात मध्यवस्तीत येऊ लागले आहेत. गेल्या आठवड्यात कसबा बावडा परिसरात आढळलेल्या सहा गव्यांच्या कळपानंतर वडणगे परिसरातही काही गवे वनविभागाला आढळले. त्यानंतर आता आज, रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा चार गव्यांचा कळप विन्स हॉस्पिटलच्या परिसरात खानविलकर पेट्रोलपंपामागील ढेरेकर मळ्याजवळ आढळल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली. उसातील फडकऱ्यांना तसेच जयंती नाला परिसरातील नागरिकांनाही हे गवे दिसल्याचे सांगण्यात येते.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार हे चार गवे असून, त्यातील दोन पूर्ण वाढीचे आहेत. त्यातील एक मादी असून, एक लहान गवा असल्याचा अंदाज आहे. नदीकाठच्या गवतात खिंडीत हे गवे आढळल्याने वनविभागाने सतर्क राहात नाकाबंदी केली आहे. गवे शहरात येऊ नयेत यासाठी मिरचीची धुरी देण्याचा तसेच शेकोटी पेटविण्याचा मार्ग पत्करला आहे. बचाव पथकाचे आणि करवीर वनविभागाचे मिळून सात जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, गस्त सुरू आहे. करवीरचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील, बचाव पथकाचे प्रदीप सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने नाकाबंदी केली आहे.

गव्यांपासून दूर राहण्याचे आवाहन
दरम्यान, वडणगे परिसरात आढळलेले गवे वेगळे असून, अंगापिंडाने ते छोटे आहेत. खानविलकर पंपाजवळ दिसणारे पूर्ण वाढीचे आणि ताकदवान गवे असल्याने त्यांच्याजवळ जाण्याचा किंवा त्यांच्याशी छेडछाड करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, त्यांच्यापासून दूर राहण्याचे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Sighting of herd of four cows in Kolhapur city again, rescue team on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.