छोटा स्थलांतरित दुर्मीळ ‘व्हिनचॅट’ पक्ष्याचे देवगडमध्ये दर्शन
By संदीप आडनाईक | Published: October 26, 2024 06:43 PM2024-10-26T18:43:45+5:302024-10-26T18:44:33+5:30
संदीप आडनाईक कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये ‘व्हिनचॅट’ या दुर्मीळ पक्ष्याचे दर्शन झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधून या पक्ष्याची दुर्मीळ नोंद ...
संदीप आडनाईक
कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये ‘व्हिनचॅट’ या दुर्मीळ पक्ष्याचे दर्शन झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधून या पक्ष्याची दुर्मीळ नोंद झाली आहे. पक्षी निरीक्षकांनी युरोपियन पक्ष्याची केलेली ही नोंद जिल्ह्याचे पक्षीवैभव अधोरेखित करणारी ठरली आहे.
राज्यातील गवताळ आणि पाणथळ अशा दोन्ही अधिवासांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होत आहे. काही पक्षी हे दरवर्षी राज्यात येतात. मात्र, स्थलांतरित पक्ष्यांच्या काही प्रजाती दिशा भरकटून इतर प्रदेशांत येतात, यातीलच व्हिनचॅट नावाचा हा छोटा पक्षी राज्यात स्थलांतरित होऊन आला आहे.
मूळ युरोपातील हा पक्षी १२ ते १४ सेंटीमीटर आकाराचा आणि वजन १३ ते २६ ग्रॅम वजनाचा असतो. युरोप आणि पश्चिम आशिया देशांमध्ये मे ते ऑगस्ट या काळात त्याचे प्रजनन असते. ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान तो मध्य आफ्रिकन प्रदेशामध्ये स्थलांतर करतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये तो भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील काही राज्यांमध्ये भरकटत स्थलांतरित झाला. अशाच प्रकारे तो सिंधुदुर्गात आला असण्याची शक्यता सिंधुदुर्गातील पक्षी निरीक्षकांनी व्यक्त केली आहे. हा पक्षी सध्या देवगड तालुक्यात दिसतो आहे.
व्हिनचॅट हा गवताळ अधिवासामध्ये स्थलांतर करणारा पक्षी आहे. दरवर्षी स्थलांतर करून येणाऱ्या सायबेरियन स्टोनचॅट म्हणजेच गप्पीदास या पक्ष्यांसारखाच दिसत असल्याने त्याची ओळख पटविणे कठीण होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील पक्षी निरीक्षक डाॅ.श्रीकृष्ण मगदूम यांना हा पक्षी देवगडमध्ये १५ ऑक्टोबर रोजी दिसला.
गप्पीदासपेक्षा या पक्ष्याच्या पाठीवरील रंग आणि आकार वेगळा जाणवल्याने त्यांनी त्याची छायाचित्रे टिपली आणि पक्षीतज्ज्ञ आदेश शिवकर यांच्या माध्यमातून त्याची ओळख पटवून घेतली. डोळ्याच्या वर पांढरा पट्टा असल्याची माहिती शिवकर यांनी दिली. महाराष्ट्रामधील या पक्ष्याची ही दुसरी नोंद असून, यापूर्वी सोलापूरमधून या पक्ष्याची नोंद झाली आहे.
पहिल्यांदा हा पक्षी पाठमोरा पाहिल्यामुळे त्याचे वेगळेपण जाणवले नव्हते. मात्र, मान वळवून पाहताना त्याच्या चेहऱ्यावरील रचनेमुळे तो गप्पीदासपेक्षा वेगळा दिसला. हा पक्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडल्याने जिल्ह्याचे पक्षीवैभव अधोरेखित झाले आहे. -डाॅ.श्रीकृष्ण मगदूम, पक्षी निरीक्षक.