‘संकेत’च्या वेदनेला मिळाली माणुसकीची साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2016 12:42 AM2016-02-16T00:42:28+5:302016-02-16T00:54:17+5:30
जखमीवर तातडीने उपचार : मिताली पाटील’ चा पुढाकार, अरुंधती महाडिक यांच्याकडून कौतुक
कोल्हापूर : अपघात झाल्यावर रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी फारसे कुणी पुढे येत नाही, असा अनुभव असताना एका तरुणीने हे धाडस दाखवून शाळकरी मुलास सीपीआर रुग्णालयात दाखल केल्याने त्याच्यावर वेळेत उपचार होऊ शकले. ही घटना सोमवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास बागल चौक रस्त्यावर घडली. संकेत कांबळे (रा. यादवनगर) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याच्या डाव्या पायाला मोठी इजा झाली असून, त्याच्यावर रात्री उशिरा खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला किमान पंधरा दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे. मिताली पाटील या आयडीबीआय बँकेत नोकरीस असलेल्या तरुणीने हे धाडसी काम केले. ती भागीरथी युवती मंचची राजोपाध्येनगर शाखेची अध्यक्षा आहे. भोगावती कारखान्याच्या छत्रपती शाहू इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या वर्षा परशुराम कोतेकर यांच्या त्या कन्या आहेत. अपघातस्थळी धावून गेल्याबद्दल मिताली हिचे मंचच्या संस्थापक अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी कौतुक केले. घडले ते असे, ‘मिताली ही मैत्रिण पूजा डकरे हिच्यासह मोटारसायकलवरून बँकेत नोकरीस निघाली होती. कोटितीर्थच्या अलीकडे कोपऱ्यावर एका शाळकरी मुलगा जोरजोराने ओरडत असल्याचे तिने पाहिले व ती लगेच धावून गेली. तिथे गर्दी जमली होती; परंतु मुलाचे नातेवाईक येईपर्यंत त्यास रुग्णालयात नेण्यास कोण तयार नव्हते. मितालीने पुढाकार घेतला व रिक्षात बसवून ती त्याला सीपीआरमध्ये घेऊन गेली. रिक्षात बसल्यावर त्याच्या मामालाही माहिती देऊन सीपीआरला या, असे सांगितले. त्यावेळी संकेतला खूप वेदना होत होत्या. त्याला तिने मोठ्या बहिणीप्रमाणे मायेचा आधार देत धीर दिला. ‘सीपीआर’ला नेल्यावर प्रथमोपचार झाल्यावर पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असून त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संकेतला खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. ज्यांच्या कारने त्याला जखमी केले ते स्वत:ही रुग्णालयात आले. त्यांनी रुग्णालयाचा खर्च उचलण्याची ग्वाही दिली. रिक्षाचालकही मोठ्या मनाचा होता. त्याने रिक्षा भाडे तर घेतले नाहीच शिवाय रुग्णालयात दाखल करण्यासही त्याने मदत केली.
मदतीचे आवाहन
संकेत याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई इचलकरंजीत असून, ती घरगुती कामे करून पोट भरते. संकेत हा आजी व मामाजवळ कोल्हापुरात शाळेसाठी राहतो. त्याच्यावरील उपचाराचा खर्च पेलण्याची कुटुंबीयांची ताकद नाही. त्याला रुग्णालय खर्चासाठी मदत करण्याचे आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.