सर्वसाधारण सभा लांबण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:27 AM2021-02-11T04:27:18+5:302021-02-11T04:27:18+5:30
कोल्हापूर : विरोधी पक्षनेते विजय भोजे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची तातडीची प्रतिक्रिया म्हणून शिक्षण विभागाचा पंचनामा ...
कोल्हापूर : विरोधी पक्षनेते विजय भोजे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची तातडीची प्रतिक्रिया म्हणून शिक्षण विभागाचा पंचनामा करण्यासाठी विशेष सभेची मागणी करण्यात आली. परंतु, ही सभा बोलावताना सत्तारूढ आघाडीसमोरही पेच असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.
भोजे यांच्याविरोधात जिल्हा परिषदेतील एका महिला अधिकाऱ्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मंगळवारी दिवसभर सत्तारूढ आणि विरोधकांनी एकत्र येत संध्याकाळी ३४ जणांच्या सह्यांनिशी शिक्षण विभागाच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलावण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यासाठी अध्यक्ष पाटील यांच्या सहीचे पत्र सामान्य प्रशासन विभागाला पोहोच होणे आवश्यक होते. परंतु, तब्बल २४ तास उलटून गेल्यानंतरही असे पत्र दिले न गेल्याने विशेष सभेची नोटीस काढण्यात आलेली नाही. त्यामुळे ही सभा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
एकीकडे सभा घ्या म्हणून विरोधकांसह सत्तारूढ सदस्यांनीही सह्या करून निवेदन दिले आहे आणि दुसरीकडे एका अधिकाऱ्यांना लक्ष्य करून चर्चा होत असताना ते काही सत्तारूढांनाही अडचणीचे ठरू शकते. त्यामुळेच विशेष सभेची नोटीस तातडीने काढली नसल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होत आहे.