कोविड साहित्य खरेदी घोटाळा अधिवेशनात गाजण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:46 AM2021-03-04T04:46:50+5:302021-03-04T04:46:50+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत ८८ कोटींच्या कोविड साहित्य खरेदीत झालेल्या ३५ कोटींचा घोटाळा सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत ८८ कोटींच्या कोविड साहित्य खरेदीत झालेल्या ३५ कोटींचा घोटाळा सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. तक्रारदार असलेले जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर हे कागदपत्रे घेऊन बुधवारी मुंबईला रवाना झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही सर्व घोटाळ्याची फाईल देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
मंगळवारी निंबाळकर यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन लेखापरीक्षकांचा अहवाल व बाजारातील किमतीचा तुलनात्मक अभ्यास करून लॉकडाऊनकाळात कोरोना प्रतिबंधासाठी शासकीय समितीने खरेदी केलेल्या साहित्यात घोटाळा केल्याचे उघड केले होते. एक कोटीवरील खरेदीचे प्रधान सचिवांचे अधिकार असतानाही परस्पर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या सहीने खरेदी झाल्याची, ई टेंडर प्रक्रिया राबविली नसल्याची, वाढीव दराने साहित्य खरेदी केल्याचे पुरावेच दिले होते. खरेदीत तब्बल ३५ कोटींचा घोटाळा झाल्याचेही त्यांनी उघड केले होते. हे करताना दोषींवर कारवाईच्या मागणीसह जनतेच्या पैशांवर डल्ला असल्याचे आणि शासकीय निधीचा गैरवापर असल्याचे सांगत ‘कॅग’मार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
बुधवारी निंबाळकर यांनी कागदपत्रासह मुंबई गाठली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे या घोटाळ्याकडे लक्ष वेधण्याबरोबरच यावर दोन्ही सभागृहांत चर्चा घडावी या हेतूने विरोधी पक्षनेते व प्रदेशाध्यक्षांकडे याबाबतची सर्व माहिती सांगितली जाणार आहे. ‘कॅग’मार्फत चौकशी करायची तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अर्ज करावा लागणार असल्याने फडणवीस व पाटील यांच्या माध्यमातून तेथे पोहोचण्याचाही या भेटीमागे हेतू आहे.