पॅसेंजर बंद असल्याने लहान रेल्वे स्थानकांवर शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:15+5:302021-09-02T04:50:15+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी कोल्हापुरातून धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेची सेवा बंद असल्याने जिल्ह्यातील लहान रेल्वे स्थानकांवर शांतता पसरली आहे. ...
कोल्हापूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी कोल्हापुरातून धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेची सेवा बंद असल्याने जिल्ह्यातील लहान रेल्वे स्थानकांवर शांतता पसरली आहे. या स्थानकामध्ये गांधीनगर-वळीवडे, रूकडी, तमदलगे-निमशिरगाव यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पॅसेंजर सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. कोल्हापूरमधून पुणे, सातारा, मिरज, सांगली या मार्गावरील पॅसेंजर रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ नसल्याने गांधीनगर-वळीवळे, रूकडी, तमदलगे-निमशिरगाव या स्थानकांवर शांतता पसरली आहे. स्टेशन प्रबंधक आणि काही कर्मचारी स्थानकांमध्ये उपस्थित असतात. एक्सप्रेस रेल्वे सुरू असल्याने जयसिंगपूर, हातकणंगले स्थानकांवर थोडीफार वर्दळ दिसून येते. मुंबई, पुणे येथील पॅसेंजर रेल्वे सुरू झाली आहे. त्याधर्तीवर कोल्हापूर येथून पॅसेंजरची सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे
कोल्हापूर-पुणे
कोल्हापूर- सातारा
कोल्हापूर-मिरज
कोल्हापूर- सांगली
ओस पडलेली स्थानके
गांधीनगर-वळीवडे, रूकडी, तमदलगे-निमशिरगाव
प्रतिक्रिया
एक्सप्रेस सुरू, मग पॅसेंजर बंद का?
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गेल्या दीड महिन्यापासून कोल्हापुरातून विविध मार्गांवर धावणाऱ्या एक्सप्रेस रेल्वे सुरू झाल्या आहेत. नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी पॅसेंजर रेल्वेची सेवा लवकर सुरू करावी.
-शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती
इंधन दरवाढ झाल्याने एस. टी.चे तिकीट दरांमध्ये वाढ झाली आहे. या स्थितीत पॅसेंजर रेल्वे सर्वसामान्यांना आधार ठरणारी आहे. पॅसेंजर सुरू करण्याबाबत रेल्वे विभाग आणि सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी, खासदार धैर्यशील माने यांच्याकडे मी केली आहे. पॅसेंजर सेवा लवकर सुरू व्हावी.
-ललित शहा, प्रवासी, जयसिंगपूर
चौकट
आदेशानुसार कार्यवाही
कोल्हापुरातून दिल्ली, मुंबई, धनबाद, नागपूर, पुणे, तिरुपती,आदी मार्गांवरील रेल्वेसेवा सुरू आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. कोल्हापूरमधून सहा पॅसेंजर रेल्वे आहेत. मात्र, सध्या त्यांची सेवा बंद आहे. पॅसेंजर रेल्वेची सेवा सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेच्या विभागाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल, असे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचे प्रबंधक ए. आय. फर्नांडीस यांनी मंगळवारी सांगितले.