Maratha Reservation : पाच जिल्ह्यांत मराठा समाजाचे मूक आंदोलन : १६ जूनला कोल्हापुरातून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 06:19 PM2021-06-10T18:19:48+5:302021-06-10T18:22:11+5:30
Maratha Reservation : कोल्हापुरातून दि. १६ जूनपासून मूक आंदोलनाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे रणशिंग फुंगले जाईल, अशी घोषणा करतानाच खासदार संभाजीराजे यांनी, मराठा समाजाने आतापर्यंत संयम दाखविला आता, आक्रमकपणा काय असतो तो दाखवू, अशा गर्भित इशाराही गुरुवारी दिला.
कोल्हापूर : समाजातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्यांना देशातील पहिलं आरक्षण ज्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी दिले, त्या शाहू भूमीतून म्हणजेच कोल्हापुरातून दि. १६ जूनपासून मूक आंदोलनाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे रणशिंग फुंगले जाईल, अशी घोषणा करतानाच खासदार संभाजीराजे यांनी, मराठा समाजाने आतापर्यंत संयम दाखविला आता, आक्रमकपणा काय असतो तो दाखवू, अशा गर्भित इशाराही गुरुवारी दिला.
कोल्हापूर शहरातील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी दुपारी सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकांची एक बैठक पार पडली, त्यावेळी खासदार संभाजीराजे बोलत होते. कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नाही, कोल्हापुरातील संसर्ग तर राज्यातील सर्वांत जास्त असल्याने मोर्चाऐवजी प्रातिनिधिक आंदोलन करावे, अशी सूचना बैठकीत आल्यामुळे संभाजीराजे यांनी मोर्चाऐवजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारक समाधी स्थळाजवळ मूक आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला.
सकल मराठा समाजाचे समन्वयकांबरोबर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री यांनी मूक आंदोलनात सहभागी व्हावे. आम्ही या आंदोलनात कोणीच बोलणार नाही; पण आमदार, खासदार, मंत्री यांनी येथे येऊन आपली मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिक स्पष्ट करावी. आम्हाला तुमच्या पाठिंब्याची नुसती पत्रे नकोत. तुम्ही तेथे या, भूमिका स्पष्ट करा. आरक्षण देण्याकरिता कशा पद्धतीची जबाबदारी घेणार ते ठोसपण सांगा, असेही आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले.