आरक्षणप्रश्नी महाराष्ट्राला दिशादायक ठरणाऱ्या मूक आंदोलनाचा आज कोल्हापुरातून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:34 AM2021-06-16T04:34:36+5:302021-06-16T04:34:36+5:30

कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांबाबतच्या लढ्यासाठी महाराष्ट्राला दिशादायक ठरणाऱ्या मूक आंदोलनाचा आज, बुधवारी कोल्हापुरातून प्रारंभ होणार ...

The silent agitation, which is a direction for Maharashtra, started from Kolhapur today | आरक्षणप्रश्नी महाराष्ट्राला दिशादायक ठरणाऱ्या मूक आंदोलनाचा आज कोल्हापुरातून प्रारंभ

आरक्षणप्रश्नी महाराष्ट्राला दिशादायक ठरणाऱ्या मूक आंदोलनाचा आज कोल्हापुरातून प्रारंभ

Next

कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांबाबतच्या लढ्यासाठी महाराष्ट्राला दिशादायक ठरणाऱ्या मूक आंदोलनाचा आज, बुधवारी कोल्हापुरातून प्रारंभ होणार आहे. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत आंदोलन होईल. त्यामध्ये जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार हे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. कोल्हापूरसह राज्यातील मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी येथे सांगितले.

या समाधिस्थळी होणाऱ्या मूक आंदोलनाच्या तयारीची खासदार संभाजीराजे आणि संयोगिताराजे छत्रपती यांनी मंगळवारी सकाळी पाहणी केली. त्यानंतर मराठा समाजातील समन्वयकांची बैठक घेऊन त्यांच्या सूचना, मते जाणून घेतील. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनासाठी मराठा समाजातील बांधवांना वेठीस धरायचे नाही. आरक्षणासाठी समाज, समन्वयक बोलले आहेत. त्यामुळे आरक्षण देण्याच्या दृष्टीने मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आता बोलावे यासाठी राज्यभर मूक आंदोलन केले जाणार आहे. त्याची सुरुवात कोल्हापूरमधून बुधवारी होणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून हे आंदोलन होईल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. या वेळी आर. के. पोवार, जयेश कदम, महेश जाधव, दिलीप देसाई, प्रा. जयंत पाटील, बाबा इंदुलकर, अजित राऊत, दिगंबर फराकटे, फत्तेसिंह सावंत, निवासराव साळोखे, इंद्रजित सावंत, सुजित चव्हाण आदी उपस्थित होते.

चौकट

मी, समन्वयक कोणी बोलणार नाही

आपण केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील दोन मंत्री, बारा आमदार, दोन खासदार मूक आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांना सन्मान देऊन त्यांची भूमिका आपण समजून घ्यायची आहे. त्यांना कोणीही उलट-सुलट प्रश्न विचारायचा नाही. आपण मौन राखायचे. कोल्हापूरने नेहमी महाराष्ट्राला दिशा दिली आहे. त्यामुळे या पद्धतीने आदर्शवत ठरणारे, महाराष्ट्राला दिशा देणारे आंदोलन करू या. मी, समन्वयक कोणी बोलणार नसल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. बुधवारी मूक मोर्चा नाही, तर आंदोलन होणार आहे. त्यामुळे त्यासाठी केवळ समन्वयकांनी उपस्थित राहावे. गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

चौकट

या पद्धतीने होईल आंदोलन

या समाधिस्थळाच्या उजव्या बाजूला जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, तर डाव्या बाजूला खासदार संभाजीराजे, कोल्हापूर आणि राज्यातील सकल मराठा समाजाचे समन्वयक, ‘सारथी’ संस्था आणि विविध पदांवरील नियुक्तींच्या प्रतीक्षेतील विद्यार्थी, मराठा समाजबांधव, भगिनी बसणार आहेत. या आंदोलनात काळ्या फिती लावून सकल मराठा समाज सहभागी होणार आहे. लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडल्यानंतर अखेरीस खासदार संभाजीराजे पुढील जिल्ह्यातील आंदोलन जाहीर करतील.

Web Title: The silent agitation, which is a direction for Maharashtra, started from Kolhapur today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.