मूकबधिर महिलेच्या हंबरड्याने फुटला अश्रूचा बांध -अंत्यसंस्कार करणारे कार्यकर्तेही गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:19 AM2021-07-17T04:19:26+5:302021-07-17T04:19:26+5:30

कोल्हापूर : अनेक दिवस अंत्यसंस्काराचे काम करताना बऱ्याच लोकांचे अश्रू पुसले; पण आम्ही डोळ्यात कधी अश्रू येऊ दिले नव्हते. ...

Silent deaf woman's humbarda bursts into tears - funeral workers also go deep | मूकबधिर महिलेच्या हंबरड्याने फुटला अश्रूचा बांध -अंत्यसंस्कार करणारे कार्यकर्तेही गहिवरले

मूकबधिर महिलेच्या हंबरड्याने फुटला अश्रूचा बांध -अंत्यसंस्कार करणारे कार्यकर्तेही गहिवरले

Next

कोल्हापूर : अनेक दिवस अंत्यसंस्काराचे काम करताना बऱ्याच लोकांचे अश्रू पुसले; पण आम्ही डोळ्यात कधी अश्रू येऊ दिले नव्हते. पण गुरुवारची रात्र मात्र त्यास अपवाद ठरली. एका मूकबधिर महिलेने कोरोनाने आई गेल्यावर फोडलेल्या हंबरड्याने आमच्याही अश्रूंचा बांध फुटला, अशा भावना भवानी फाउंडेशनचे हर्षल सुर्वे आणि प्रिया पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या. त्यांनी सांगितलेला प्रसंग कुणाच्याही डोळ्यांचा कडा ओल्या करणारा आहे.

घडले ते असे- सीपीआर रुग्णालयातून डॉ. वेंकटेश पवार यांचा फोन आला. एका महिलेवर अंत्यसंस्कार करायचे आहेत, त्यांची मुलगी मूकबधिर आहे. क्षणाचाही विचार न करता रुग्णालयात पोहोचलो. आम्हीच सही करून मृतदेह ताब्यात घेतला. अजून दोन मृतदेह होते ते पण घेतले. तेथून निघणार इतक्यात डॉ तेजस्विनी यांचा फोन आला. आशा हामरे यांचा मृतदेह नेला नसेल तर थांबा... त्यांच्या मुलगीस घेऊन येते. अंत्यदर्शन करू या. त्या मुलगीस बोलता येत नव्हते की, ती जे हावभाव करत होती ते आम्हाला काही समजत नव्हते. तिने कपाळावरील कुंकवाकडे हातवारे करत ती माझी असल्याचे खूण करून सांगितले. कोणीतरी रुग्णाचे नातेवाईक महिला, एक तृतीयपंथी महिला आणि प्रिया पाटील यांनी तिला सांभाळले. गाडीचा दरवाजा उघडला अन् तिने हंबरडा फोडला... तिच्याकडे पाहून आम्ही सगळेच गलबलून गेलो. तोपर्यंत त्या मृत महिला ज्या ठिकाणी काम करत होत्या त्यांचे घरमालक आले. त्यांनीच त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले होते. त्यांनीही अंत्यदर्शन घेतले. स्मशानभूमीत गेल्यावर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या अन्य एका कुटुंबाकडून प्रियाने विनंती करून एक साडी आशा हामरे यांच्यासाठी घेतली. ती साडी नेसवून त्या महिलेवर अंत्यसंस्कार केले आणि सुन्न मनाने आम्ही घरी परतलो.

आधार कोण देणार...?

गेल्या दोन महिन्यांत आम्ही छातीवर दगड ठेवून कित्येक अंत्यसंस्कार केले. त्यावेळी भावनांना आवर घातला; पण आज त्या आम्ही रोखू शकलो नाही. आता आमच्यापुढे प्रश्न आहे तो त्या मूकबधिर महिलेला आधार कोण देणार?

Web Title: Silent deaf woman's humbarda bursts into tears - funeral workers also go deep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.