मूक सरकार आता बोलायला लागलंय
By admin | Published: October 10, 2016 01:05 AM2016-10-10T01:05:42+5:302016-10-10T01:05:42+5:30
पी. एन. पाटील : अल्पसंख्याक समितीची भेट
कोल्हापूर : महाराष्ट्रभर निघणाऱ्या मराठ्यांच्या मूक मोर्चांमुळे मराठा आरक्षण प्रश्नावर मूक झालेलं सरकार आता बोलायला लागलंय, अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी केली. काँग्रेस अल्पसंख्याक पश्चिम महाराष्ट्र समितीच्या बैठकीवेळी ते बोलत होते. मराठ्यांनी जी ताकद दाखवली त्याच पद्धतीने आपल्या प्रश्नांसाठी मुस्लिमांनी ताकद दाखवावी, असे आवाहनही पाटील यांनी केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अल्पसंख्याकाच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी विभागनिहाय ३० जणांच्या पाच समित्या केल्या असून माजी आमदार हाफिज धत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यानिमित्त काँग्रेस कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पी. एन. पाटील म्हणाले, ‘मुस्लिमांचे लाड करणारा पक्ष’ म्हणून आमच्यावर टीका झाली; परंतु कोणत्याही टीकेला भीक न घालता या समाजाच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे राहिली आहे. यावेळी हाफिज धत्तुरे यांनी मुस्लिमांबाबतच्या सर्व योजनांचा आढावा घेऊन केवळ काँग्रेसच या समाजाचे भले करू शकते. शासनाच्या योजनांची माहिती घेऊन त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, शादी खाना, दफनभूमी, शिष्यवृत्ती या सर्व प्रश्नांबाबत वेळोवेळी काँग्रेसने सत्तेत असताना सकारात्मक भूमिका घेत मोठा निधी दिला. मात्र, गेल्या दोन वर्षांत शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीत.
मराठा समाजाला आरक्षणासाठी मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला आहे. त्यानंतर कायदेशीर अभ्यास करून मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे यासाठी काँग्रेस पक्ष सहकार्य करेल. आमच्यावर पंजाचा शिक्का असून भाजप जातीयवाद वाढवत असल्याचा आरोप अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष इर्शाद बंडवल यांनी केला. यावेळी नदीम मुजावर, प्रकाश सातपुते, पैगंबर शेख, अमिन शेख, झाकीर पठाण, कादर मलबारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)