समस्त ख्रिश्चन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 05:39 PM2019-01-29T17:39:33+5:302019-01-29T17:42:20+5:30
होलीक्रॉस शाळेवर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता, कडक कारवाई करावी. तसेच ख्रिश्चन समाजाच्या शैक्षणिक संस्थांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी मंगळवारी समस्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.
कोल्हापूर : होलीक्रॉस शाळेवर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता, कडक कारवाई करावी. तसेच ख्रिश्चन समाजाच्या शैक्षणिक संस्थांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी मंगळवारी समस्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.
सकाळी ११ वाजता होलीक्रॉस शाळेपासून मूक मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चामध्ये अनेकांनी ‘ख्रिश्चन समाज संस्था शाळा व लोकांवरील हल्ले थांबवा’, ‘द्वेषाने नव्हे, प्रेमाने जगूया’, ‘ख्रिश्चन समाजावरील हल्ले थांबवा’, ‘वादाचे नव्हे, संवादाचे आदर्श’ अशा आशयांचे फलक हातामध्ये घेऊन शेकडो महिला व युवती सहभागी झाले होते. तसेच सहभागी सर्व बांधवांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध नोंदविला होता.
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व कोणतीही घोषणाबाजी न करता मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. या ठिकाणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की होलीक्रॉस ही शाळा फक्त मुलींसाठी असून, सर्व धर्म व जातीच्या मुली उत्तमप्रकारे शिक्षण घेत आहे.
शाळेत जादातर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गामध्ये महिलांचा समावेश आहे. त्याचे व्यवस्थापनही सिस्टर्स पाहतात. अशा ठिकाणी हल्ला करण्याचे कृत्य म्हणजे समाजाला काळिमा फासणारे आहे. यासह ख्रिस्ती समाजावर अनेकवेळा हल्ले झाले आहेत. हल्ला करणारे समाजकंटक यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही; त्यामुळे या प्रकरणीही कोणत्याही दबावास बळी न पडता, संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी.
शिष्टमंडळात देवराज बारदेस्कर, व्हिक्टर बोरजीस, रुझाई गोनसालव्हीस, एम. गोपटे, डॅनियल धनवडे, रोझीलन गोडात, रिटा रॅडिक्स, जे. पी. बारदेस्कर यांचा समावेश होता. जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजाच्या शाळेचे संस्थापक, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिस्तबद्ध मोर्चा
मूक मोर्चामध्ये हजारो ख्रिश्चन बांधव सहभागी झाले असले, तरी अत्यंत शांततेने व शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये कुठेही घोषणाबाजी किंवा गोंधळ नव्हता. मोर्चा संपल्यानंतर प्रत्येक बांधव अत्यंत शांततेने परत गेला.
ख्रिस्ती समाजाचा हा मूक मोर्चा कोणत्याही धर्म व संघटनेच्या विरोधात नाही. आम्ही नेहमीच वाच्यता न करता सामाजिक योगदान देत असतो. शाळेवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी हा मोर्चा आहे.
- देवराज बारदेस्कर