सायलंट आॅब्झर्व्हर झाली ‘सायलंट’
By admin | Published: June 27, 2015 12:48 AM2015-06-27T00:48:01+5:302015-06-27T00:55:12+5:30
गर्भलिंग चाचणी नियंत्रणमुक्त : शहरात १११ सोनोग्राफी केंद्रे
\कोल्हापूर : जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक सोनोग्राफी यंत्र ‘सायलंट आॅब्झर्व्हर’ प्रणालीला जोडण्यात आले होते. यामुळे गर्भलिंग निदान करणाऱ्या प्रत्येक केंद्रावर आॅनलाईन नजर होती. मात्र, ही प्रणालीच बंद झाल्यामुळे सोनोग्राफी केंद्रे आणि गर्भलिंग चाचणी यंत्रे नियंत्रणमुक्त झाली आहेत. प्रत्येक केंद्रावर चोवीस तास नजर ठेवण्याइतके शासकीय यंत्रणेकडे मनुष्यबळही नाही. ते शक्यही नाही. त्यामुळे गर्भलिंग निदान चाचणी जिल्ह्यात सुरू असल्याचे उघड होत आहे.
जुना वाशीनाका चौकात आलिशान कारमध्ये गर्भलिंग चाचणी करणारे मोबाईल सोनोग्राफी यंत्र घेऊन कारसह संशयितरीत्या थांबलेल्या दोघा डॉक्टरांसह चालकाला बुधवारी (दि. २४) पोलिसांनी अटक केली. त्यामुळे पुन्हा एकदा गर्भलिंग चाचणी करण्याचा विषय चव्हाट्यावर आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण ८३० वरून ८७० आणण्यात यश आले आहे.
तीन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख जिल्हाधिकारी असताना सायलंट आॅब्झर्व्हर प्रणालीला प्रत्येक सोनोग्राफी यंत्रणेला जोडण्यात आली होती. त्यामुळे सोनोग्राफी यंत्रावर प्रत्येक सोनोग्राफीची नोंद आपोआप होत होती. त्याचा धसका घेऊन सोनोग्राफी केंद्रात आणि रुग्णालयात ‘येथे गर्भलिंग चाचणी केली जात नाही, चौकशी करू नये’ असा फलक ठळक अक्षरांत लिहिण्यात आला. मात्र प्रणालीच बंद झाली असल्यामुळे सोनोग्राफी यंत्रच नियंत्रणमुक्त झाले आहे. भरमसाट पैसे मिळत असल्यामुळे काही केंद्रांवर गर्भलिंग चाचणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
चायना बनावटीच्या व अन्य कंपन्यांची यंत्रे बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. त्याव्दारेससस गर्भलिंग चाचणीचा धंदाच उघडला आहे. नोंदणीकृत असलेले १११ सोनोग्राफी केंदे्र आहेत. विनापरवाना किती आहेत, याची नोंद कोठेही नाही. घटणाऱ्या मुलींच्या जन्मदराची गांभीर्याने नोंद नूतन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी घेतली आहे. त्यांनी पुन्हा सायलंट आॅब्झर्व्हर सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.