अहमदाबादमधून येणाऱ्या चांदीत भेसळ

By Admin | Published: July 19, 2016 11:11 PM2016-07-19T23:11:18+5:302016-07-20T01:13:52+5:30

शुद्धतेत फसवणूक : रौप्यनगरीतील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका; चांदी पेटीतही तफावत

Silver in adulthood from Ahmedabad | अहमदाबादमधून येणाऱ्या चांदीत भेसळ

अहमदाबादमधून येणाऱ्या चांदीत भेसळ

googlenewsNext

तानाजी घोरपडे --हुपरी --चांदीत भेसळ, टंचात मारणे, व्यवहारात व्यापाऱ्यांकडून फसवणूक, पोलिसांकडून चिरिमिरीसाठी छळवणूक, चोरट्यांकडून लुबाडणूक, वायदेबाजारात आलेले अपयश, आदी कारणांनी त्रस्त झालेल्या रौप्यनगरीतील चांदी व्यावसायिकांची आता अहमदाबाद (गुजरात) पेठेवरून होलसेल स्वरूपात आलेल्या चांदी पेटीतही फसवणूक सुरू आहे. या पेटीतील चांदीचा टंच (शुद्धता) ९९.९९ टक्के अपेक्षित असताना त्यामध्ये एक ते दीड टक्क्यांची तफावत आढळून येत असल्याने व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
यापूर्वी अशा प्रकारच्या विविध मार्गाने फसवणूक झालेल्या व होत्याचे नव्हते झालेल्या आठ ते दहाजणांनी आत्महत्या केल्या आहेत. तर काहींचे आयुष्य मातीमोल झाल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. विविध मार्गाने होणारी फसवणूक काही केल्या रौप्यनगरीवासीयांची पाठ सोडण्यास तयार नाही, असेच या सर्व घडामोडींतून म्हणणे भाग पडत आहे.
हुपरीच्या चांदी उद्योगाचा आत्मा समजल्या जाणाऱ्या धडी उत्पादकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या चांदी भेसळ प्रकरणाने तर संपूर्ण चांदी उद्योगाची डोकेदुखी होऊन बसली आहे. परपेठेवरून येणाऱ्या चांदीच्या रूप्यामध्ये अगदी खुबीने भेसळ करून त्या रूप्याचा टंच बदलायचा व हे रूपे विक्रीसाठी बाजारात आणावयाचे, असा उद्योग अनेकजण गेल्या काही वर्षांपासून बेमालूमपणे करीत आहेत. या गोलमाल पद्धतीमुळे लाखो रुपयांचा फटका बसलेल्या सर्वसामान्य धडी उत्पादकांचे संसार उद्ध्वस्त होऊन ते देशोधडीला लागल्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळत आहेत. या चांदी भेसळ प्रकरणामुळे रौप्यनगरी म्हणून संपूर्ण देशात नावलौकिक असलेल्या हुपरी शहराचे नावही बदनाम होत आहे.
याबाबत रौप्यनगरी हुपरीतील काही चांदी उद्योजकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शुद्ध चांदीची खरेदी ही प्रदेशातून करण्यात येते. ती ४९ नावाने चांदीचे सर्वांत मोठे मार्केट असणाऱ्या अहमदाबाद (गुजरात) मार्केटमध्ये सर्वप्रथम येते. देशातील बहुतांश उद्योजक येथूनच चांदी खरेदी करतात. या मार्केटमधून चांदी कोल्हापूर मार्केटमध्ये येत असते. अशा व्यवहारात व प्रवासात कमी वेळेत, कमी व्यापार करून जास्त नफा मिळविण्याच्या मोहातून शुद्ध चांदीमध्ये भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली असल्याचे समोर येत आहे. याचा आर्थिक फटका मात्र सर्वसामान्य चांदी व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात चांदी खरेदी करणारे बडे उद्योजक अशा प्रवृत्तीतून आणखीन गर्भश्रीमंत होत आहेत. मात्र, लहान व्यावसायिक देशोधडीला लागत आहेत. हे वास्तव असल्याचे सांगून आपले नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी ही माहिती दिली.


४३२१ परपेठेवरील सराफांना त्यांच्या मागणीनुसार तयार झालेले दागिने देण्यासाठी घेऊन जात असताना काहीवेळा चोरट्यांकडून लुबाडणूक होत असते. चोरट्यांबरोबरच जनतेचे रक्षक म्हणवून घेणाऱ्या पोलिसांचीच भीती जास्त सतावत असते. वाटेत कुठेही अडवून तपासणीच्या नावाखाली चिरिमिरीसाठी कायद्याचा धाक दाखवून, छळवाद मांडून आर्थिक पिळवणूक केली जाते.
परपेठेवरील सराफांना पोसण्यासाठी कायद्याच्या आधारे येथील चांदी व्यावसायिक आपला व्यवहार करीत नाहीत. त्यामुळे परपेठेवरील सराफांकडून फसवणूक होण्याच्या घटनाही घडत असतात. तसेच काही स्थानिक व्यावसायिकांकडूनही अनेक फसवणुकीचे प्रकार घडले आहेत.
बेभरवश्याच्या वायदेबाजाराच्या व्यवहारात सहभाग घेतलेले अनेक व्यावसायिक अक्षरश: भिकेकंगाल झाले असून, आपल्या आयुष्याची माती झाल्याने त्यानी आत्महत्येचा मार्ग धरला आहे. अशा बऱ्याच घटनांमुळे चांदी व्यावसायिक घेरला गेला असतानाच आता आणखी एका संकटाने डोके वर काढल्याचे निदर्शनास येत आहे.
अहमदाबाद (गुजरात) पेठेतून हुपरी, कोल्हापूरमध्ये येत असलेल्या चांदीच्या पेटीतील चवश्याच्या (पाटला) टंचामध्ये दीड ते दोन टक्क्यांचा फरक आढळून येत आहे. परिणामी, हा फरक लाखो रुपयांच्या घरात जात असल्याने चांदी व्यावसायिकही हबकून गेले आहेत.
५ विविध मार्गाने होणारी चांदी व्यावसायिकांची फसवणूक काही केल्या पाठ सोडायला तयार नसल्याने या स्पर्धेच्या साठमारीमध्ये व्यवसाय कसा करायचा, अशी समस्या निर्माण होऊन दिवसेंदिवस आणखीन डोकेदुखी वाढली जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.

Web Title: Silver in adulthood from Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.