Kolhapur: लग्नसराईंची नांदी, आचारसंहितेत अडकली हुपरीची 'चांदी'

By पोपट केशव पवार | Published: March 22, 2024 12:58 PM2024-03-22T12:58:14+5:302024-03-22T12:59:04+5:30

बिल दाखवूनही जप्त केला जातोय माल

Silver business is in trouble due to the code of conduct of the Lok Sabha elections during the Lagna Sarai | Kolhapur: लग्नसराईंची नांदी, आचारसंहितेत अडकली हुपरीची 'चांदी'

Kolhapur: लग्नसराईंची नांदी, आचारसंहितेत अडकली हुपरीची 'चांदी'

पोपट पवार

कोल्हापूर : चांदीच्या कलाकुसरीमुळे देशभर प्रसिद्ध असलेला हुपरी परिसरातील चांदी व्यवसाय ऐन लग्न सराईच्या काळातच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडचणीत आला आहे. हुपरी परिसरातून पाठविले जाणारे चांदीचे दागिने, त्यातून मिळणारे पैसे देशभरातील चेकपोस्टवर जप्त केले जात असल्याने या परिसरातील सहा हजार उद्योजकांना बनवलेल्या चांदीचे करायचे काय, असा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे बनवलेला माल परराज्यात पाठवणेच बंद केल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ४० हजार कामगारांच्याही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हुपरी (ता. हातकणंगले) या परिसरात चांदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. चांदीचा व्यवसाय करणारे सहा हजार उद्योग या परिसरात आहेत. येथील सर्व माल बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थानसह देशभरात पाठवला जातो. परप्रांतात चांदीचे दागिने पुरवठा करण्यासाठी जाणाऱ्या उद्योजकांकडे जातेवेळी तयार दागिने असतात, तर येतेवेळी चोख चांदी, कच्ची चांदी, चांदीची मोड तसेच काही रक्कम असते. 

सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. पैसे, सोने, चांदी, अशा मौल्यवान वस्तूंची प्रत्येक चेकपोस्टवर तपासणी होते. खरेदी-विक्री केल्याचे बिल असूनही चेकपोस्टवर चांदी व्यावसायिकांचा माल, पैसे जप्त केले जात आहेत. या पैशाशी, मालाशी निवडणुकीचा कोणताही संदर्भ नसल्याचे पुरावे देऊनही त्यांना सोडले जात नसल्याने हे व्यावसायिक हतबल झाले आहेत.

रोज तीन टन पैंजण

हुपरी परिसरात रोज चांदीचे तीन टन पैंजण बनवले जातात. हा माल देशभर पाठवला जातो. सध्या लगीनसराई सुरू आहे. पैंजणला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, याच काळात आचारसंहिता सुरू असल्याने माल पाठवण्यास उद्योजक घाबरत आहेत. मागणी असूनही माल पाठवता येत नसल्याने उद्योजकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

चांदी व्यवसाय दृष्टिक्षेपात

-उद्योग-६ हजार
-कामगार-४० हजार
-रोज बनते तीन टन पैंजण

हुपरीतून देशभरात चांदीचा माल पाठवला जातो. आचारसंहिता काळात या मालाची वाहतूक करताना उद्योजकांनी नेमकी कोणती कागदपत्रे सोबत ठेवावीत याबाबत प्रशासनाने आम्हाला सांगावे. - मोहन खोत, अध्यक्ष, चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन, हुपरी.

Web Title: Silver business is in trouble due to the code of conduct of the Lok Sabha elections during the Lagna Sarai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.