नवरात्रोत्सवापूर्वी अंबाबाई मंदिराला चांदीचे दरवाजे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 11:57 AM2022-09-16T11:57:16+5:302022-09-16T11:57:47+5:30
देशातील ५१ शक्तिपीठे आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत प्रमुख स्थान असलेल्या अंबाबाईचा नवरात्रोत्सव देशभरात प्रसिद्ध
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या पितळी उंबऱ्यातील दरवाज्यांना नवरात्रोत्सवापूर्वी चांदीची चकाकी मिळणार आहे. पूर्वीचे दरवाजे खराब झाल्याने आता सागवानी लाकडापासून नवे दरवाजे बनवले जात आहेत. प्रत्येक दरवाज्यावर ९० किलो याप्रमाणे १८० किलो चांदीचा पत्रा लावण्यात येणार आहे. देवीचा चांदीचा रथ देखील नव्याने करण्यात येणार आहे. गुरुवारपासून मंदिराच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. शारदीय नवरात्रोत्सव २६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
देशातील ५१ शक्तिपीठे आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत प्रमुख स्थान असलेल्या अंबाबाईचा नवरात्रोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. उत्सवाच्या आधी १५ दिवसांपासून प्राथमिक तयारी सुरू झाली असून, आता खऱ्या अर्थाने उत्सवाचे पडघम वाजू लागले आहे. त्याची सुरूवात गुरुवारी मंदिर स्वच्छतेपासून झाली. मुंबईतील संजय मेंटेनन्स कंपनीकडून अंबाबाई मंदिरासाठी ही सेवा मोफत पुरवली जाते. त्यासाठी कंपनीची टीम गुरुवारी सकाळीच कोल्हापुरात दाखल झाली आणि त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. मंदिराच्या प्राचीन दगडी बांधकामाला कोणतीही इजा न पोहोचवता किंवा केमिकलचा वापर न करता फक्त पाण्याच्या फवाऱ्याने ही साफसफाई केली जाते. पहिल्या दिवशी दीपमाळा स्वच्छ करण्यात आल्या.
अंबाबाई मंदिराच्या पितळी उंबऱ्यातील दरवाजे आणि मुख्य गाभाऱ्यातील दरवाजे चांदीचे करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात नवरात्रोत्सवापूर्वी पितळी उंबऱ्यातील दरवाजे केले जातील. पूर्वीचे दरवाजे खराब झाल्याने आता नवे दरवाजे तयार करून त्यावर चांदीचे पत्रे लावले जाणार आहेत. त्यासाठी खास कोकणातून कारागीर आले आहेत. मागील काही वर्षांत अंबाबाईच्या रथोत्सवावेळी रथाचा दांडा तुटण्याचे प्रकार झाले आहेत, तसे पुन्हा घडू नये यासाठी त्यातील मूळ लाकडी रथदेखील नव्याने बनवला जाणार आहे. दरवाज्यांचे काम झाले की रथाच्या कामाला सुुरूवात होईल.
१२ लाखांचे सागवान देवीच्या चरणी
अंबाबाई मंदिराच्या चांदीच्या दरवाज्यांचे काम पूर्णत: भाविकांच्या देणगीतून केले जात आहे. गाभारा व पितळी उंबरा दोन्हीकडील दरवाज्यांसाठी ४०० किलो चांदी गोळा झाली आहे. त्याआधी लाकडी दरवाजे बनविण्यात येणार आहेत. त्यासाठी चेन्नईतील व्यापारी भक्तीमल पटवा (जैन) यांनी १२ लाखांचे सागवान मोफत दिले आहे.