चांदी उद्योजकांची 'कसोटी', कर्जास ढीगभर अटी; कोल्हापूर जिल्ह्यातून सव्वाशे कोटींचा कर देवूनही मिळेना कर्ज
By पोपट केशव पवार | Updated: April 5, 2025 16:43 IST2025-04-05T16:42:31+5:302025-04-05T16:43:25+5:30
पोपट पवार कोल्हापूर : एकीकडे उद्योग - व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदरात कर्ज अन् अनुदानाच्या ढीगभर योजना सरकारकडून राबवल्या जात ...

चांदी उद्योजकांची 'कसोटी', कर्जास ढीगभर अटी; कोल्हापूर जिल्ह्यातून सव्वाशे कोटींचा कर देवूनही मिळेना कर्ज
पोपट पवार
कोल्हापूर : एकीकडे उद्योग - व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदरात कर्ज अन् अनुदानाच्या ढीगभर योजना सरकारकडून राबवल्या जात असताना दुसरीकडे हजारो जणांना रोजगार देणाऱ्या चांदी उद्योगाला एक पै चेही कर्ज बँकांकडून दिले जात नसल्याचे चित्र आहे.
बँकांचे कर्जच मिळत नसल्याने सरकारकडूनही चांदी उद्योगाला कोणत्याच प्रकारचे अनुदान, सवलत मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी, चांदी उद्योगाची वाढ खुंटली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरातून चांदी उद्योजक वर्षाला १२५ कोटी रुपयांचा कर शासनाला भरतात. मात्र, याच उद्योजकांना एक रुपयाचेही कर्ज बँकांकडून दिले जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात हुपरी परिसरात हस्तकला चांदी उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. येथील कलाकुसर केलेल्या चांदीला देशभरात प्रचंड मागणी आहे. हजारांवर चांदी उद्योजक या परिसरात असून या व्यवसायामुळे हजारो तरुणांना राेजगाराची संधी मिळाली आहे. पूर्वी चांदी उद्योगाला खासगी बँकांसह राष्ट्रीयीकृत बँकांकडूनही कर्ज दिले जात होते.
मात्र, मागील दहा वर्षांपूर्वी साेने-चांदी व्यवसायात असलेला नीरव मोदी कोट्यवधी रुपयांची बँकांची कर्जे बुडवून परदेशात पळाल्याने सोने-चांदी व्यावसायिकांबद्दलची विश्वासार्हता कमी झाली. त्याचा परिणाम म्हणजे थेट रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना पत्र लिहून सोने-चांदी व्यावसायिकांना कर्ज देताना प्रचंड अटी टाकल्याने या व्यावसायिकांना कर्ज मिळण्याचा मार्गच बंद झाला आहे. चांदी उद्योग हस्तकलेवर अवलंबून आहे. मात्र, जर या व्यवसायात ७० टक्के मशिनरी असेल तरच कर्जाचा विचार करू, असे बँकांकडून सांगितले जाते. त्यामुळे बँकांची ही अट या व्यवसायवाढीला मारक ठरत आहे.
थेट जिल्हाधिकाऱ्यांना साकडे तरीही..
हुपरी परिसरातील चांदी उद्योजक दिवसेंदिवस वाढत आहेत. येथील उद्योग अजून वाढावा, नव्या उद्योगाची भर पडावी, यासाठी बँकांच्या अर्थसहाय्याची गरज भासते. बँकांनी चांदी उद्योगाला कर्जपुरवठा करावा, त्यासाठी बँकांना सूचना द्याव्यात, अशी मागणी हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनचे मोहन खोत यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली होती. त्यांच्या आदेशाने शिखर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चांदी उद्योगाला कर्जपुरवठा करण्याच्या सूचना बँकांना दिल्या होत्या. मात्र, अद्यापही या बँकांकडून कर्ज दिले जात नसल्याचे चित्र आहे.
दृष्टिक्षेपात व्यवसाय
- चांदी व्यावसायिक - ७ हजार
- मिळालेला रोजगार - ३५ हजार
- वर्षाला भरला जाणारा जीएसटी - १२५ कोटी.
बँकांकडून चांदी उद्योगाला कर्जपुरवठा होत नसल्याने व्यवसायाची वाढ खुंटली आहे. जिल्हा प्रशासनाने सरकारी व सहकारी बँक प्रतिनिधींची बैठक बोलवून चांदी उद्योगाला कर्जपुरवठा करण्याच्या सूचना द्याव्यात. - मोहन खोत, अध्यक्ष, हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन