पोलीस हॉकी स्पर्धेत ‘महाराष्ट्रा’ला रौप्य
By admin | Published: March 3, 2016 12:54 AM2016-03-03T00:54:16+5:302016-03-03T00:59:11+5:30
६४ वर्षांनंतर यश : कोल्हापूरचे पाचजण संघात
कोल्हापूर : गुवाहाटी (आसाम) येथे सोमवारी झालेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या हॉकीच्या अंतिम सामन्यात इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा दलाकडून महाराष्ट्र पोलीस संघास २-१ असा पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ६४ वर्षांनंतर महाराष्ट्र संघाला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारता आली. विजयी संघात कोल्हापूर पोलीस दलाच्या पाच खेळाडूंचा समावेश होता.
गुवाहाटी येथे झालेल्या या स्पर्धेत देशातील सर्व राज्यांच्या पोलीस दलांच्या संघांबरोबरच इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा दल, सीआरपीएफ, आदी संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राने उपांत्य फेरीत सीआरपीएफ या संघावर ४-३ अशी अटीतटीच्या सामन्यात मात करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा दलाच्या संघाला मोठी निकराची झुंज दिली. सामना संपूर्ण वेळेत गोलशून्य राखण्यात यश मिळविले. सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने मुख्य पंचांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लावण्याचा निर्णय घेतला. त्यात इंडो-तिबेटियन संघाने दोन गोल केले, महाराष्ट्राला एकच गोल करता आला. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस संघास रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या या हॉकी संघात कोल्हापूर पोलीस दलाचे हॉकीपटू सत्यजित सावंत, संदीप सावंत, मुकुंद रजपूत, आयूब पेंढारी, विनोद मनुगडे यांनी चांगला खेळ केला. या खेळाडूंना कोल्हापूर जिल्हा पोलीसप्रमुख प्रदीप देशपांडे, हॉकी मार्गदर्शक संदीप जाधव, इजाज शेख, मोहन गवळी, आदींचे मार्गदर्शन मिळाले.