रौप्यनगरीस अच्छे नव्हे, बुरे दिन
By admin | Published: November 5, 2015 11:23 PM2015-11-05T23:23:11+5:302015-11-05T23:58:29+5:30
मंदीचा मोठा फटका : जागतिक बाजारपेठेतील चांदी दरामध्ये प्रचंड घसरण
तानाजी घोरपडे --हुपरी--देशातील काही राज्यांमध्ये ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, बाजारपेठेतून घटलेली मागणी, जागतिक बाजारपेठेतील मंदीच्या वातावरणामुळे चांदी दरामध्ये झालेली प्रचंड घसरण या सर्व अडचणींच्या वादळात रौप्यनगरीचा चांदी व्यावसायिक सापडला गेला आहे. चांदीच्या दरातील घसरणीमुळे प्रॉफिट (नफा)वरती मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने यंदाची दिवाळी चांदी व्यावसायिकांसाठी थंडा... थंडा... कुल... कुल... ठरत आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम रौप्यनगरीच्या बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात झाल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. तसेच अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेली दिवाळी कशी साजरी करावयाची या समस्येने सर्वजण ग्रासले गेले आहेत.
जागतिक बाजारपेठेतील मोठ्या प्रमाणातील मंदीचे वातावरण उद्योग निर्मात्याकडून घटलेली मागणी देश-विदेशामध्ये विविध कारणांनी निर्माण झालेली आर्थिक व राजकीय संकटग्रस्त परिस्थिती या सर्व घडामोडीमुळे आशियाई बाजारपेठेत गेल्या दीड-दोन वर्षांच्या काळामध्ये चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळाचा विचार करता चांदीच्या दराने अभूतपूर्व अशी नीचांकी पातळी गाठली आहे. परिणामी रौप्यनगरीच्या व्यवहारावरती त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने चांदी व्यावसायिकांचे जणू कंबरडेच मोडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सन २०१३ मध्ये ऐतिहासिक अशा ७२ हजार प्रती किलो दराचा विक्रम नोंदविणारा चांदीचा दर आता केवळ ३५ ते ३६ हजारच्या घरात खेळत आहे. परिणामी या व्यावसायिक खरेदी-विक्री आयात-निर्यातीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. चांदीच्या दरामध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात घसरण होत राहिल्याने रौप्यनगरी व परिसरातील संपूर्ण चांदी उद्योगामध्ये मंदीचे वातावरण पसरले गेले आहे. सद्याची चांदीच्या दरातील घसरण सव्वाशे वर्षांच्या चांदी व्यवसायाच्या कालावधीतही कधी अनुभवण्यास मिळालेली नाही. परिणामी पाच-सहा वर्षांपासूनच सर्वच उपयोगातील जागतिक मंदीमुळे हतबल होण्याची वेळ चांदी व्यावसायिकांवरती आली आहे.
मोठा फटका : तोट्याचा व्यवसाय
दरातील घसरणीला सर्वांत जास्त फटका धडिमाल उत्पादक व परपेठेवरती जाऊन दागिने विक्री करणाऱ्या फिरती व्यावसायिकांना बसला आहे. दागिने तयार करण्यासाठी मिळणाऱ्या प्रती किलोच्या मजुरी व वेस्टेजमध्ये उत्पादन खर्च भागत नाही, परिणामी तोटा सहन करून व्यवसाय करावा लागत आहे. तसेच परपेठेवर जाऊन दागिने विक्री करण्याच्याही प्रॉफिट (नफा) मध्ये मोठ्या प्रमााणात परिणाम झाला आहे.
बाजारपेठेतही शुकशुकाट
प्रवासखर्च वास्तव्यामध्ये वाढ व नफ्यामध्ये घट अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे धडिमाल उत्पादक व फिरती व्यवसायिकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. चांदीच्या दरातील घसरणीमुळे संपूर्ण चांदी व्यावसायिकांचेच कंबरडे मोडले गेल्याने यंदाची दिवाळी कशी साजरी करावयाची या प्रश्नाने त्यांना ग्रासले आहे.
चांदी व्यावसायातील या परिस्थितीचा परिणाम रौप्यनगरीच्या बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर झाल्याने चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या
दिवाळी सणावेळीही बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे.