जिगरी दोस्तांची नौसेनेत एकाचवेळी भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:24 AM2021-03-17T04:24:41+5:302021-03-17T04:24:41+5:30

मुरगुडमध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या दोघा जिगरी दोस्तांची एकाचवेळी एकाच ठिकाणी नौसेनेमध्ये भरती झाली आहे. मुरगुडचा श्रेयश चौगुले आणि सावर्डे ...

Simultaneous recruitment of close friends in the Navy | जिगरी दोस्तांची नौसेनेत एकाचवेळी भरती

जिगरी दोस्तांची नौसेनेत एकाचवेळी भरती

Next

मुरगुडमध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या दोघा जिगरी दोस्तांची एकाचवेळी एकाच ठिकाणी नौसेनेमध्ये भरती झाली आहे. मुरगुडचा श्रेयश चौगुले आणि सावर्डे बुद्रुकचा दयानंद हिरुगडे अशी मित्रांची नावे आहेत. येथील शिवराज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गेल्यावर्षी दोघांचे बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण झाले. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. श्रेयस कुस्तीपटू तर दयानंद धावपटू असल्याने दोघांचेही सैन्य भरतीचे लक्ष्य होते. त्यादृष्टीने दोघांनीही अभ्यास आणि शारीरिक कसरतीचा एकत्र सराव केला.

श्रेयश चौगुले हे गाजलेले मल्ल श्रीकांत चौगुले यांचा मुलगा. मुलाने कुस्तीमध्ये चांगले करिअर करावे यासाठी त्यांची धडपड होती. दयानंद हिरुगडे हा सावर्डे बुद्रुक येथील महालक्ष्मी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर मुरगुडात आत्याकडे संजय मोरबाळे यांच्या घरी राहून शिक्षण घेतले. वडील मंडलिक कारखान्यात बॉयलर अटेंडंट असून दयानंदने बारावीनंतर तासगाव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत सैनिकी भरतीच्या परीक्षेसाठी कसून अभ्यास केला. यातूनच श्रेयश आणि दयानंद यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. या परीक्षेतून भारतीय नौसेना दलात (SSR) दोघांचीही भरती झाली. ओडिसामधील चिल्का याठिकाणी फिजिकल टेस्ट झाल्यानंतर दोघांचीही निवड निश्चित झाली. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी दोघेही नुकतेच रवाना झाले. एकाच वर्गातील वर्ग मित्रांची एकाच ठिकाणी झालेली निवड चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरली आहे.

Web Title: Simultaneous recruitment of close friends in the Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.