भाजप सरकारकडून धर्मनिरपेक्षतेला सुरुंग लावण्याचे पाप : सुरेश माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:13 AM2020-02-03T10:13:22+5:302020-02-03T10:14:48+5:30
ही भारतीय लोकशाहीच्या मजबुतीसाठी चांगली बाब आहे. नागरिकत्व कायदा यापूर्वी पाच वेळा बदलला असताना कधीही एवढा प्रचंड विरोध झाला नाही. मात्र नागरिकत्व कायदा २०१९, संसदेद्वारे बहुमताने पास झालेला असतानाही याला विरोध होत आहे, याचा विचार केंद्रातील भाजप सरकारने करणे आवश्यक आहे.
कोल्हापूर : नागरिकत्व कायद्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने धर्माच्या आधारावर भेदाभेद करून धर्मनिरपेक्षतेला सुरुंग लावण्याचे पाप केले आहे, अशी टीका बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अॅड. सुरेश माने यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
अॅड. माने म्हणाले, मोदी सरकार देशातील सर्वधर्मीय मतदारांना भीतीच्या धमक्या देऊन आपली व्होट बॅँक पक्की करण्यासाठी नागरिकत्व नोंदणी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे गैरवापर करीत असून त्यांचे हे कृत्य हे नक्कीच देशविरोधी आहे. या कायद्याला देश-विदेशांत विरोध होत आहे. ही भारतीय लोकशाहीच्या मजबुतीसाठी चांगली बाब आहे. नागरिकत्व कायदा यापूर्वी पाच वेळा बदलला असताना कधीही एवढा प्रचंड विरोध झाला नाही. मात्र नागरिकत्व कायदा २०१९, संसदेद्वारे बहुमताने पास झालेला असतानाही याला विरोध होत आहे, याचा विचार केंद्रातील भाजप सरकारने करणे आवश्यक आहे.
देशातील बहुतांश जनतेच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्रश्नांशी संबंधित अनेक प्रश्न देशाच्या अर्थव्यवस्थेसह प्रलंबित असताना भाजप सरकारने अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे व नागरिकत्व कायदा यांचाच हेकटपणा करून संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण निर्माण करणे, ही शोकांतिका आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, आर. के. कांबळे, अॅड. श्रीकांत मालेकर, संतोष कांबळे, आदी उपस्थित होते.