सिंधुदुर्ग : बंदुका बनविण्याच्या कारखान्यावर छापे, माणगाव येथे एक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:38 PM2018-03-10T17:38:59+5:302018-03-10T17:38:59+5:30
फेब्रिकेशनच्या नावाखाली अवैधरित्या छुप्या पध्दतीने बंदुका बनविल्या जात असलेल्या कारखान्यावर सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने छापे टाकून बंदुकांसह काडतुसे जप्त केली.
सिंधुदुर्ग : फेब्रिकेशनच्या नावाखाली अवैधरित्या छुप्या पध्दतीने बंदुका बनविल्या जात असलेल्या कारखान्यावर सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने छापे टाकून बंदुकांसह काडतुसे जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी कुडाळ तालुक्यातील माणगाव - कुंभारवाडी येथे करण्यात आली असून, या प्रकरणी परेश कृष्णा धुरी (३५) याला अटक करण्यात आली आहे. तर अन्य चौघा कामगारांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
माणगाव-कुंभारवाडी येथे परेश धुरी याने तीन वर्षांपूर्वी फेब्रिकेशनचे दुकान घातले होते. मात्र, या दुकानात फेब्रिकेशनच्या नावाखाली तो बंदुका बनवत असे. या बंदुकांमध्ये काडतुसाच्या बंदुकांचा समावेश होता. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला लागली. प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी आपल्या पथकासह शुुक्रवारी दुपारपासूनच माणगाव-कुंभारवाडी येथील फेब्रिकेशनमध्ये सर्च आॅपरेशन सुरू केले होते.
यामध्ये त्यांना चार बंदुका आढळून आल्या आहेत. यात एक काडतुसाची, तर तीन ठासणीच्या बंदुकांचा समावेश आहे. बंदुका तयार करण्यासाठी लागणारे सामानही पोलिसांनी जप्त केले. या कारवाईत पोलिसांना गावठी कट्टाही सापडला आहे. मात्र, याला उशिरापर्यंत दुजोरा दिला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पोलिसांना बंदुका बनवण्याचा कारखाना आढळून आला आहे. त्यामुळे पोलिसही चांगलेच सतर्क झाले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी परेश धुरी याला अटक केली असून, त्याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्याच्या दुकानात असलेल्या कामगारांकडूनही पोलीस माहिती घेत असून, त्यांना उशिरापर्यंत अटक करण्यात आली नव्हती. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी दुकान तसेच अन्य ठिकाणांची झाडाझडती सुरूच ठेवली असून, तयार केलेल्या बंदुका कोणाला विकण्यात आल्या तसेच आहे त्या बंदुका कोणासाठी तयार करण्यात येत होत्या, याची चौकशी करीत होते. पण आरोपीने उशिरापर्यंत कोणतीही माहिती दिली नव्हती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच कारवाई
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच माणगाव येथे बंदुका तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी छापे टाकून उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईमुळे पोलिसांचे अभिनंदन होत असले तरी जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे. माणगावमधून तयार केलेल्या बंदुका कुठे विक्री केल्या जात होत्या याची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. या पथकाचे पोलीस अधीक्षकांनीही कौतुक केले आहे.