कुरुंदवाडचे मुख्याधिकारी बनले 'सिंघम' अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:34+5:302021-06-26T04:17:34+5:30
कुरुंदवाड : पालिकेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये समन्वयाच्या अभावामुळे गेल्या साडेचार वर्षांत शहराच्या विकासाला ‘ब्रेक’ मिळाला आहे. मात्र, मुख्याधिकारी निखिल जाधव ...
कुरुंदवाड : पालिकेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये समन्वयाच्या अभावामुळे गेल्या साडेचार वर्षांत शहराच्या विकासाला ‘ब्रेक’ मिळाला आहे. मात्र, मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकालात प्रशासकीय कामकाजातून शिस्त आणि कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधी फिके पडले असून मुख्याधिकारी जाधव यांनी दबदबा निर्माण केला आहे.
त्यामुळे मुख्याधिकारी 'सिंघम' अधिकारी म्हणून चर्चेत आहेत.
पालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. भाजप विरोधात आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांमध्ये परस्परात सत्तासंघर्ष, समन्वयाच्या अभावामुळे शहराच्या विकासाला ‘ब्रेक’ मिळाला आहे.
मुख्याधिकारी जाधव जुलै २०१९ मध्ये रूजू झाले. अन् प्रलयकारी महापुराचे संकट आले. शहरातील राजकीय, भौगोलिक परिस्थितीची माहिती नसतानाही संयमाने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, शासकीय, दातृत्वाकडून आलेल्या मदतीत राजकीय हस्तक्षेप, पक्षपातीपणा थांबवून गरजवंतांपर्यंत पोहोचविल्याने शहरवासीयांची मने जिंकली.
नैसर्गिक संकटातही शहर स्वच्छतेला महत्त्व देत शहरवासीयांना स्वच्छतेत सामावून घेत स्वच्छता मोहीम राबविल्याने गतवर्षी स्वच्छता अभियानात थ्री स्टार मानांकन मिळाले तर यंदा शौचालययुक्त शहर म्हणून ओडीएफ डबल प्लस मानांकन मिळाले आहे.
कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून वेळोवेळी येणाऱ्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर होती. त्यामुळे काहीवेळा लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले तरी प्रशासकीय बाजू सक्षमपणे मांडल्याने शहरातील कोरोना संख्या नियंत्रित राखण्यात यश मिळाले आहे. त्यांच्या या कार्याची जिल्हाधिकारी यांच्याकडून कौतुकही झाले.