कोल्हापुरात एकच चर्चा, मराठा मोर्चा
By admin | Published: October 15, 2016 12:46 AM2016-10-15T00:46:59+5:302016-10-15T00:46:59+5:30
सकल मराठा मोर्चा : आज दुमदुमणार मराठी मनाचा नि:शब्द हुंकार; अभूतपूर्व आणि उत्कंठावर्धक वातावरण
कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून बैठका-मेळावे, पदयात्रांतून मराठा मोर्चाबद्दल झालेली प्रचंड जनजागृती, त्यातून उफाळून आलेला मराठ्यांचा स्वाभिमान, मोर्चाच्या संयोजनात अन्य जातिधर्मांच्या समाजाने घेतलेला सक्रिय सहभाग, मोर्चाची घटिका जवळ येईल तसा शिगेला पोहोचलेला आबालवृद्धांचा उत्साह, शहरात उभारलेले भगवे ध्वज, डिजिटल फलक अशा अभूतपूर्व आणि उत्कंठावर्धक वातावरणाने अवघी शाहूनगरी शुक्रवारी मराठामय झाली. संपूर्ण जिल्ह्याची स्थिती ‘एकच चर्चा, मराठा मोर्चा’ अशी झाली होती आणि मोर्चात किती लाख लोक येणार याबाबतच्या अंदाजाचे मनोरे रचले जात होते.
कोल्हापूरच्या इतिहासात मागच्या हजारो वर्षांत असा मोर्चा निघाला नाही आणि पुढच्या हजारो वर्षांत तो निघणार नाही, इतका प्रचंड प्रतिसाद तमाम कोल्हापूरवासीयांकडून या मोर्चाला मिळाला असल्याने जिल्हा प्रशासनासह पोलिस, महानगरपालिका प्रशासनही कमालीच्या तणावाखाली आले आहे. केवळ मोर्चा निघून चालणार नाही, तर मोर्चासाठी आलेले सर्व लोक अतिशय सुरक्षितपणे आपापल्या घरी गेले पाहिजेत, यासाठी सर्व पातळ्यांवर विशेष दक्षता घेतली जात आहे. यासाठी केवळ प्रशासनाचेच नाही तर लाखो स्वयंसेवकांचे हात गेल्या महिन्याभरापासून अव्याहतपणे राबत आहेत. मोर्चाची तयारी पूर्ण झाली असली तरी त्याच्या यशस्वितेसाठीची धावपळ आणि घालमेल मात्र शुक्रवारी अवघ्या मराठी मनांवर दिसून आली.
कुतूहल, उत्कंठा, धावपळ, हुरहूर अशा शब्दांचे ओझे घेऊनच शुक्रवारचा दिवस उजाडला. दिवसभर मराठा मोर्चाच्या तयारीसाठी उभारलेल्या कार्यालयांत नेहमीपेक्षा अधिकच धावपळ पाहायला मिळत होती. गेल्या काही दिवसांपासून आलेले भगवे ध्वज, स्टिकर्स, पोस्टर्स, भगव्या टोप्या, झेंड्यासाठी लागणाऱ्या काठ्या, स्वयंसेवकांचे टी शर्टस्, ओळखपत्रे, आदी साहित्यांचे वाटप या कार्यालयांतून होताना दिसत होते. आजच्या मोर्चात स्वयंसेवकांनी कोणती कामे करायची आहेत, याच्या माहितीसह त्यांनी कुठे उभे राहायचे याचीही माहिती कार्यालयातून देण्यात येत होती.
आजच्या मोर्चावेळी अंगात काळे टी-शर्ट, हातांत भगवे ध्वज व डोक्यावर भगवी टोपी घालून येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या साहित्यालाही बाजारपेठेत मोठी मागणी दिसून आली. या संधीचे सोने करत शहराच्या विविध भागांत विशेषत: बिंदू चौक, शिवाजी पुतळा, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार, ताराबाई रोड, रुईकर कॉलनी, महापालिका चौक येथे मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी ध्वज, टोप्या, टी शर्टस्चे स्टॉल्स लावल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे जनतेतून खरेदीचा उत्साहही मोठा होता. शहरात चोहोबाजूंनी भगवे ध्वज लावले गेले आहेत. (प्रतिनिधी)
आजच्या मोर्चावेळी शहरात ‘नो व्हेईकल डे’ घोषित करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी आपली वाहने बाहेर काढायची नाहीत, तर बाहेरून येणारी वाहने आत शहरामध्ये घेतली जाणार नाहीत. शहराचे प्रमुख प्रवेशमार्ग असलेल्या नऊ रस्त्यांसह लहान-मोठ्या १०० रस्त्यांवर लकडकोट उभारले गेले आहेत. या कामास महानगरपालिका बांधकाम विभागाने शुक्रवारी सकाळपासून सुरुवात केली आणि रात्री बारा वाजता सर्व काम पूर्ण केले. लकडकोट उभारण्याच्या कामात चारीही विभागीय कार्यालयांचे सुमारे २०० हून अधिक कर्मचारी व्यस्त होते. त्याशिवाय मोर्चा मार्गावर नियंत्रण ठेवण्याकरिता ३२ ठिकाणी टेहळणी मनोरे उभे केले आहेत. फूटपाथवरील गटारींची १०० हून अधिक झाकणे बदलण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांत रस्त्यांचे डांबरी पॅचवर्कही करण्यात आले.
अवघे कोल्हापूर स्वच्छ
मोर्चाच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम व्यापक प्रमाणावर राबविली जात होती. महापालिका आरोग्य विभागाचे १६ आरोग्य निरीक्षक, ८० मुकादम आणि १२०० सफाई कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले. अडीचशे टन कचरा उठाव केल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभागाने १५०० सीटची शौचालये भाड्याने घेतली असून ती मोर्चामार्गावर ठेवली आहेत. ३७ ठिकाणी कनात उभी करून तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सोय केली आहे. शहरातील २० ‘पे अॅँड युज’ स्वच्छतागृहे शुक्रवारी विनाशुल्क उपलब्ध करून दिली आहेत. याशिवाय शहरातील सर्व हॉटेल्स, सर्व मंगल कार्यालयांतील सुमारे १२०० स्वच्छतागृहे खुली करण्यात आली आहेत. महापालिकेने या सर्वांना लेखी नोटीस दिली आहे. शहरात सर्वत्र औषध व डीडीटी पावडर फवारणी करण्यात आली आहे.
गांधी मैदान टकाटक
मोर्चाची सुरुवात कुठून होणार हे लवकर निश्चित झाले नाही. गेल्या चार दिवसांत गांधी मैदान तसेच ताराराणी चौकाची घोषणा करण्यात आली. महापालिकेने गांधी मैदानावरील वाढलेले गवत तत्काळ काढून डोझर, पोकलॅन, रोलर अशी यंत्रसामग्री लावून मैदानाचे सपाटीकरण केले. मैदानाच्या चारी बाजूंच्या पायऱ्यांवरील गवत काढले, साचलेला कचरा उपसला. त्यामुळे दोन दिवसांत गांधी मैदान कात टाकून मोर्चाच्या सेवेला सज्ज झाले. स्वच्छतेमुळे संपूर्ण शहराबरोबरच गांधी मैदानही टकाटक झाले आहे.