एकीचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:55 PM2017-12-13T22:55:42+5:302017-12-13T22:57:52+5:30
एकीचे बळ मिळते फळ ही म्हण शिरोळ तालुक्यातील बुबनाळ गावाने प्रत्यक्षात खरी करून दाखविली आहे.
एकीचे बळ मिळते फळ ही म्हण शिरोळ तालुक्यातील बुबनाळ गावाने प्रत्यक्षात खरी करून दाखविली आहे. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’ असे म्हटले जाते ते खोटे नाही. हे लक्षात घेऊन केवळ पाळण्याची दोरीच न देता गावचा कारभारच तिच्या हातात दिला तर कुटुंबाबरोबरच गावाचेही भले ती करून दाखवेल, हा विश्वास बुबनाळ येथील ज्येष्ठ आणि कर्त्या पुरुषांना होता म्हणून त्यांनी २०१५ च्या निवडणुकीत ग्रामपंचायतीवर सर्व महिला सदस्य बिनविरोध निवडून आणल्या आणि त्यांच्या हाती गावचा कारभार दिला. तसे २००९ पर्यंत हे गाव जमीन, पाण्यावरून होणारे तंटे, सामाजिक वाद यासाठी कुप्रसिद्ध होते. परिणामी विकासकामांना खीळ बसला होता. गावातील काही ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन गावच्या विकासासाठी हे वाद थांबविण्याचे, सामंजस्याने सोडविण्याची भूमिका घेतली. ग्रामस्थांना विश्वासात घेतले. त्याला ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. याचा परिणाम म्हणून २००९ मध्ये झालेली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळाले. विकासकामांना गती येऊ लागली. गावात सुख, शांती आणि समृद्धीची आशा दिसू लागली. बघता बघता पाच वर्षे गेली. २०१५ची ग्रामपंचायत निवडणूक लागली. यात यापुढचे पाऊल म्हणून ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्व महिलाच निवडून आणण्याचा निर्णय झाला. ग्रामस्थांनी त्याला प्रतिसाद दिला आणि ही निवडणूकही बिनविरोध झाली. याचा डंका राज्यभर वाजला. राज्य निवडणूक आयोगानेही याची दखल घेतली. गेल्याच महिन्यात राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी बुबनाळला भेट दिली आणि महिलांकडून गावचा कारभार कसा चालविला जात आहे, याची माहिती घेतली. गावची विकासकामे पाहून ते अतिशय प्रभावित झाले. युरोपमधील माल्टा या देशात नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्थानिक स्वराज्य शासन मंचच्या परिषदेत त्यांनी या गावची यशस्वी वाटचाल आणि होणारा विकास मांडला. तो ऐकूण या परिषदेला उपस्थित राहिलेले ५३ देशांचे प्रतिनिधीही प्रभावित झाले. त्यांनी महाराष्ट्राबरोबरच बुबनाळचेही कौतुक केले. हे सारे एकीचेच बळ म्हणावे लागेल. एकी नसेल तर बेकी कशी होते, एखादी योजना कशी फसते, भांडणे कशी लागतात हे आपल्याला वेळोवेळी अनुभवता येते. दारूबंदीसाठीही अशीच महिलांची एकी गरजेची असते. अनेक गावांतील रणरागिनी एकत्र येऊन गावात बाटली आडवी करतात. दारूमुळे उद्ध्वस्त होणारे संसार सावरण्याचा प्रयत्न करतात. करवीर तालुक्यातील वाशी येथून सुरू झालेली दारूबंदीची चळवळ राज्यभर पोहोचली. एकीच्या बळाचे महत्त्व अगदी घरापासून सुरू होते. ज्या घरात कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकमत असते, कोणतेही निर्णय एकमताने होत असतात, ते घर पुढे जात असते. त्या कुटुंबाची प्रगती होत असते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, ती अलीकडे बदलली आहे. ‘हम दो हमारे दो’ला प्राधान्य दिले जात आहे. असे असले तरी ग्रामीण भागात आजही अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांनी एकत्र कुटुंब पद्धती टिकवून ठेवत प्रगती साधली आहे. घरातील सदस्यांचे जशी एकी असते तशीच ग्रामस्थांनीही केली तर गावचाही विकास साधला जातो, हे बुबनाळने दाखवून दिले आहे. इतरांसाठीही ते अनुकरणीय आहे.