अत्याचारप्रकरणी एकास सक्तमजुरी
By admin | Published: February 27, 2015 10:58 PM2015-02-27T22:58:16+5:302015-02-27T23:22:38+5:30
कऱ्हाड न्यायालयाचा निकाल : अडीच वर्षांपूर्वीचा खटला
कऱ्हाड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मारुती बापू साळुंखे (रा. तामिणे, ता. पाटण) याला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम. आर. देशपांडे यांनी सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अडीच वर्षांपूर्वीच्या या खटल्याचा शुक्रवारी निकाल लागला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मारुती साळुंखे याच्यावर विक्रोळी-मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ही घटना पाटण तालुक्यामध्ये घडल्याने गुन्हा तपासासाठी ढेबेवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक जी. डी. दरेकर, बी. आर. भरणे यांनी या प्रकरणाचा तपास केला. संबंधित अल्पवयीन मुलगी रात्रीच्या वेळी घरामध्ये टीव्ही पाहत बसलेली असताना मारुती साळुंखे याने तिला जबरदस्तीने निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने संबंधित मुलीला दिली होती. या प्रकारानंतर मुलीचे आई-वडील मुलीला घेऊन मुंबईला गेले होते. त्याठिकाणी मुलीचा गर्भपात झाला.
त्यामुळे अखेर मुलीच्या वडिलांनी याबाबत विक्रोळी-मुंबई पोलिसांत तक्रार दिल्याचे ढेबेवाडी पोलिसांनी केलेल्या तपासांत निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी मारुती साळुंखे याला अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम. आर. देशपांडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. ए. वाय. पाटील यांनी काम पाहिले. त्यांचा युक्तिवाद व सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून मारुती साळुंखेला अत्याचार प्रकरणात दोषी धरून सात वर्षे सक्तमजुरी, २५ हजार रुपये दंड तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने नऊ साक्षीदार तपासण्यात आले. डॉ. अजित पवार, डॉ. प्रज्ञा गोरे, डॉ. सविता आवटे यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. युक्तिवाद व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
- अॅड. ए. वाय. पाटील,
सरकारी वकील