सर आली धावून, बंधारे गेले वाहून
By admin | Published: June 22, 2014 12:38 AM2014-06-22T00:38:41+5:302014-06-22T00:40:31+5:30
धामणी नदीवर मातीच्या बंधाऱ्यांची स्थिती : हजारो टन माती, झाडे, लाखोंचा खर्च वाया
सांगशी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी धामणी नदीवर बांधलेले मातीचे बंधारे पावसाच्या पहिल्या सरीबरोबर वाहून गेले आहेत. बंधाऱ्यांसाठी लागलेली हजारो टन माती, कित्येक झाडे, लाखो रुपयांचा खर्च व शेतकऱ्यांचे श्रमसुद्धा या बंधाऱ्यांच्या रूपाने वाहून गेले आहेत.
वार्षिक सरासरी ६००० मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या धामणी परिसरात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. एरव्ही पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी धामणी नदी उन्हाळ्यात कोरडी पडते. पावसाळा संपताच नदीचे पाणी अडवण्यासाठी मातीच्या बंधाऱ्यांचे नियोजन या परिसरातील शेतकरी करतात.
बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्याचा उपयोग शेती, जनावरे व खर्चासाठी काटकसरीने केला जातो. या परिसरातील ४० गावांच्या शेतीचा आधार हे माती बंधारे ठरतात. सुमारे २० किलोमीटरच्या नदीपरिसरात तब्बल मातीचे आठ ते दहा बंधारे शेतकरी स्वखर्चाने बांधतात. क्षेत्रनिहाय खर्चाची तरतूद करून हे बंधारे बांधताना परिसरातील पिकाऊ माती, छोटी-मोठी झाडे यांचा वापर करतात. प्रत्येक बंधाऱ्यास सरासरी दोन हजार टन माती, झाडे व लाखभर रुपये खर्चाचा भुर्दंड शेतकरी स्वत: सोसतात. मोबदल्यात साठणाऱ्या पाण्यातून सहा महिने शेतीसाठी पाण्याची सोय करतात. उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात हे मातीचे बंधारेदेखील कोरडे पडतात. खड्डे कोरडे पडल्यावर उरते आशा ती फक्त वळवाच्या व मान्सूनच्या आगमनावर. मान्सूनच्या आगमनाने पाणीटंचाईची समस्या संपते. मात्र, उन्हाळभर आधार ठरलेले मातीचे बंधारे मात्र पुन्हा शेतकऱ्यालाच फोडावे लागतात.
गत आठवड्यापासून मान्सूनच्या पडणाऱ्या पावसामुळे आता या परिसरातील शेतकरी हे मातीचे बंधारे फोडण्यात व्यस्त आहेत. (वार्ताहर)